रायगडात 2 हजार 323 केंद्रांवर होणार मतदान; 59 गट, 118 पंचायत समिती गणांसाठी 502 उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गट आणि ११८ पंचायत समिती गणांसाठी शनिवारी मतदान होत आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत २ हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १७ लाख ३८१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी १७३ तर ११८ पंचायत समित्यांमध्ये ३२९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदान यादी, मतदार केंद्रे निश्चित झाली आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये १७ लाख ३८१ मतदार आहेत. त्यात ८ लाख ५७ हजार ९ महिला आणि ८ लाख ४६ हजार ३४७ पुरुष तसेच इतर २५ मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक निवडणूक अधिकारी तसेच तीन कर्मचारी व एक शिपाई नेमण्यात आला आहे.

भरारी पथकांचा वॉच

मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके मतदान केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी करणार आहेत. याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

पनवेल तालुक्यात सर्वाधिक केंद्रे

जिल्ह्यात २ हजार ३२३ मतदान केंद्रे आहेत. पनवेल तालुक्यात ३४६ मतदान केंद्रे असून कर्जत २२०, खालापूर १४४, सुधागड ७५, पेण १९०, उरण १३५, अलिबाग २६१, मुरुड ८१, रोहा १९४, तळा ५२, माणगाव २०६, म्हसळा ६९, श्रीवर्धन ८०, महाड २०३, पोलादपूर ६७मतदान केंद्रे आहेत. सर्वाधिक मतदान केंद्रे पनवेल तालुक्यात असून सर्वात कमी मतदान केंद्रे तळा तालुक्यात आहेत.

३६ हजार दुबार नावे

रायगड जिल्हा परिषदेत ३६ हजार ५२८ मतदारांची नावे संभाव्य दुबार यादीत आली आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावांमध्ये पुनरावृत्ती झालेल्या नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बीएलओमार्फत तातडीने त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३६ हजार ५२८ दुबार नावे मतदार यादीत आढळली आहेत.

असे असेल सत्तेचे गणित

रायगड जिल्हा परिषदेतील १५ तालुक्यांमधून जिल्हा परिषदेसाठी ५९ सदस्य निवडून येणार आहेत. यामधील तब्बल ३१ सदस्य म्हणजे पनवेल ८, अलिबाग ७, कर्जत ६, पेण ५, महाड ५ असे निवडून येतील. यामुळे या पाच तालुक्यांकडे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे. या पाच तालुक्यांतून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून करण्यात येईल. तर उर्वरित १० तालुक्यांमधून २८ सदस्य निवडून येतील यामध्ये खालापूर, उरण, रोहा, माणगाव तालुक्यांतून प्रत्येकी ४ तर सुधागड, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यांतून प्रत्येकी दोन सदस्य निवडून येणार आहेत.