
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत एकेरीत चीनच्या फेंग्रान तियान हिने मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत संघर्षपूर्ण लढतीत चीनच्या फेंग्रान तियान हिने चौथ्या मानांकित बेलारूसच्या हॅनी वंदीविकलचा २-६, ६-४, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. हा सामना २ तास ३०मिनिटे चालला.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मुख्य ड्रॉ मधील सहभागी खेळाडू थायलंडच्या पाचव्या मानांकित लानलाना तारारुडी हिने कोरियाच्या सोह्यून पार्कचे आव्हान ३-६, ६-३, ६-० असे मोडीत काढले. हा सामना २तास ४मिनिटे चालला. केवळ १७ वर्षीय ऑस्ट्रियाच्या सातव्या मानांकित लिली टॅग्गीर हिने जपानच्या इरी शिमिजूचा ६-२, ६-२ असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. २०२५ मधील ज्युनियर रोलँड गॅरो स्पर्धेतील विजेत्या लिली समोर दुसऱ्या मानांकित २०२४ मधील एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेतील विजेत्या दर्जा सेमेनिस्तजाचे कडवे आव्हान असणार आहे.
रशियाच्या तातियाना प्रोझोरोव्हा हिने क्रिस्टियाना सिडोरोव्हाचा ६-४, ६-१ असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. फिलिपिन्स ओपन महिला टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या तातियाना हिने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार खेळ करत सिडोरोव्हाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या निकोल फोस्सा हुएर्गो व थायलंडच्या मननचया सवंगकिवेने अव्वल मानांकित भारताच्या ऋतुजा भोसले व थायलंडच्या पेंगतारण प्लिपुच यांचा ४-६, ६-१(११-९) असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये ऋतुजा भोसले व पेंगतारण प्लिपुच यांनी पहिल्या सेट जिंकल्यानंतर पुढील सेटमध्ये आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखता आले नाही.
निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी:
फेंग्रान तियान(चीन) वि.वि.हॅनी वंदीविकल(४)(बेलारूस)२-६, ६-४, ६-४;
लानलाना तारारुडी(५)(थायलंड) वि.वि.सोह्यून पार्क(कोरिया)३-६, ६-३, ६-०;
लिली टॅग्गीर(७)(ऑस्ट्रिया)वि.वि.इरी शिमिजू(जपान) ६-२, ६-२;
तातियाना प्रोझोरोव्हा(रशिया) वि.वि.क्रिस्टियाना सिडोरोव्हा(रशिया) ६-४, ६-१;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
निकोल फोस्सा हुएर्गो(अर्जेंटिना)/मननचया सवंगकिवे(थायलंड) वि.वि.ऋतुजा भोसले (भारत)/पेंगतारण प्लिपुच(थायलंड)(१)४-६, ६-१(११-९).




























































