
हिंदुस्थानविरुद्ध 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप सामन्यावर बहिष्कार टाकून पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून नको ते संकट ओढवून घेतले आहे. सरकारी आदेशावर घेतलेला हा निर्णय आता त्यांच्यासाठी भारी पडण्याची दाट शक्यता आहे. आधीच अवघड असलेल्या ग्रुप ‘अ’मध्ये पाकिस्तानची वाट अधिकच बिकट झाली असून सुपर-8मध्ये प्रवेशाच्या शक्यतांना जबर धक्का बसला आहे.
ग्रुप ‘अ’चे गणित बिघडले, प्रत्येक सामना ‘करो या मरो’
ग्रुप ‘अ’मध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबिया हे संघ असून केवळ दोन संघांनाच सुपर-8मध्ये प्रवेश मिळणार आहे. हिंदुस्थानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानसाठी उरलेले तीनही सामने थेट बाद फेरीसारखे ठरले आहेत. एकही चूक म्हणजे स्पर्धेतून गाशा गुंडाळण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते.
हिंदुस्थानविरुद्ध सामना टाळणं पडणार महागात
हिंदुस्थानविरुद्ध मैदानात न उतरल्यास आयसीसी नियमांनुसार पाकिस्तानला सामना गमवावा लागेल. याचा सर्वात मोठा फटका नेट रनरेटला बसणार आहे. त्यांची पूर्ण 20 षटके मोजली जातील, मात्र धावा शून्य धरल्या जाणार असल्याने पाकिस्तानचा नेट रनरेट प्रचंड घसरणार आहे. सुपर-8च्या शर्यतीत हा मुद्दा सर्वात निर्णायक ठरू शकतो.
कोलंबोचा पाऊस वाढवतोय डोकेदुखी
पाकिस्तानच्या अडचणी इथेच थांबत नाहीत. कोलंबोतील पावसाचा अंदाज संघासाठी नवा अडसर ठरत आहे. सलग तीन दिवस पावसाची शक्यता असून नेदरलँड्सविरुद्धचा सकाळी होणारा सामना पावसामुळे कमी षटकांचा ठरल्यास त्याचा फायदा प्रतिस्पर्ध्यालाच होऊ शकतो. छोटे सामने गुणतालिकेचा सारा नूर पालटवू शकतात.
अमेरिका आणि नामिबिया सोपे नाहीत
पाकिस्तानचा दुसरा सामना 10 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध तर शेवटचा सामना 18 फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध होणार आहे. पावसाचा धोका कमी असला तरी आव्हान मोठे आहे. अमेरिकेने 2024च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत करून धक्का दिला होता, तर नामिबियालाही हलक्यात घेणे धोकादायक ठरू शकते.
नेदरलँड्स आणि अमेरिका ठरताहेत ‘डार्क हॉर्स’
नेदरलँड्स आणि अमेरिका हे दोन्ही संघ मोठे उलटफेर घडवण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे हिंदुस्थानविरुद्ध सामना टाळण्याचा निर्णय पाकिस्तानसाठी आत्मघातकी ठरतो की काय, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
pakistan’s super 8 dreams in danger: t20 world cup equations after india match boycott
pakistan faces a major crisis in group a of the t20 world cup. boycotting the match against india could lead to negative run rates and early exit. check the latest points table scenario.

























































