बंगळुरू महामार्गावर कांद्याचा ट्रक उलटला, घुणकीजवळ अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पुण्याहून आलेला कांद्याने भरलेला ट्रक बंगळुरू महामार्गावर घुणकीनजीक ओढय़ाच्या पुलाजवळ पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तांदूळवाडीपर्यंत (जि. सांगली) वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर कोल्हापूरकडे येणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.

कांदा घेऊन आलेल्या ट्रक घुणकीनजीकच्या पुलानजीक रस्त्यावरच पलटी झाल्याने सर्व कांदा रस्त्यावर विखुरला. यामुळे पुण्याकडून येणारी वाहने थांबली. तांदूळवाडीपर्यंत वाहतूक ठप्प झाली. या अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.

कागल-सातारा महामार्गाचे सहापदरीकरण सुरू आहे. घुणकीनजीकच्या ओढय़ावरील पूर्वेकडील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे पश्चिमेकडील पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वारंवार अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. पुण्याकडून येणाऱया बाजूस पुलानजीक पश्चिमेकडील पुलावरून वाहतूक वळविली आहे. अचानक वळण घ्यावे लागत असल्याने वेगाने आलेल्या वाहनांवर चालकांचा ताबा राहत नाही. त्यामुळे बहुतांशवेळा वाहने उलटली जातात. आजचा अपघात चालक झोपेत असल्याने घडला असल्याची घटनास्थळी चर्चा होती.