
चेन्नई सिंगम्सने आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग’ (ISPL) सीजन 3 च्या किताबावर आपले नाव कोरले आहे. शुक्रवारी सुरत येथील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने टायगर्स ऑफ कोलकाताचा 29 धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले.
सर्वात आधी चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर केतन म्हात्रेने 16 चेंडूत 30 धावांची तुफानी खेळी केली, तर सर्फराज खानने 11 चेंडूत 20 धावांचे मोलाचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये गणेश आणि संभाजीने केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नईने10 षटकांत 103 धावांचा मोठा टप्पा गाठला. कोलकाताच्या गोलंदाजांनी काही विकेट्स घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण चेन्नईची सुसाट खेळी रोखण्यात त्यांना अपयश आले.
या हंगामात जगन्नाथ सरकारला ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ (MVP) म्हणून घोषित करण्यात आले असून त्याला बक्षीस म्हणून आलिशान ‘पोर्श 911’ कार देण्यात आली. आयएसपीएल सीजन ३ मध्ये अनेक नवीन तारे चमकले, ज्यात कोलकाताचा अंकित यादव (16 विकेट्स) आणि हैदराबादचा प्रशांत घरत (203 धावा) यांचा समावेश आहे.



























































