
टोरेस गुंतवणूक फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या युक्रेनियन अभिनेता अरमेन अटाईन याला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. गुह्याचे गांभीर्य आणि देशातून पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
टोरेस ज्वेलरी ब्रँड चालवणाऱया प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित पंपनीने लाखो नागरिकांची कोटय़वधींची फसवणूक केली असून या प्रकरणी 10 हजार 848 लोकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपी व युक्रेनियन अभिनेता अरमेन अटाईन याला मालाड मालवणी येथून अटक करण्यात आली होती. आपण निर्दोष असून प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड पंपनीचा आपण संचालक, प्रवर्तक नाही किंवा प्रतिनिधी नाही. आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले असून तपास यंत्रणांना आपण सहकार्य करत असल्याचा दावा अरमेन याने जामीन अर्जात केला होता. अरमेनच्या जामीन अर्जावर न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.बी. रोटे यांच्यासमोर नुकतीच सुनावणी झाली. तेव्हा सरकारी पक्षाने त्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध करत या कटात त्याचा सहभाग असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.


























































