उपनगरी रेल्वेचे जाळे विस्तारणार, ’एमयूटीपी-4’ नियोजन अभ्यासासाठी सल्लागार प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Western Railway to Start 4 New Local Train Services from February 1

> मंगेश मोरे

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबरोबरच नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेल आदी भागांतील लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्या लोकसंख्येच्या सोयीसाठी उपनगरी रेल्वेच्या नेटवर्कचा आणखी विस्तार करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) पुढचे पाऊल टाकले आहे. एमआरव्हीसीने ‘एमयूटीपी-4’ नियोजन अभ्यासासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘एमयूटीपी-4’ अभ्यासात अतिरिक्त मार्गिका, रेल्वे स्थानकांचा विकास तसेच सुरक्षा व क्षमता वाढ करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

उपनगरी रेल्वेवर दिवसेंदिवस प्रवाशी संख्येचा ताण वाढत चालला आहे. त्यामुळे लोकलसेवेच्या क्षमतावाढीची तसेच अतिरिक्त मार्गिकांची गरज भासली आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रकल्पांना गती दिलेल्या एमआरव्हीसीने आता ‘एमयूटीपी-4’ नियोजन अभ्यासासाठी सल्लागार प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-4 अंतर्गत रेल्वे नेटवर्क विस्तार, अतिरिक्त मार्गिका आणि प्रणाली सुधारणांचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पुढील 2-3 महिन्यांत निविदा मंजूर होणार

उपनगरी रेल्वे मार्गावरील भविष्यातील आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पद्धतशीर रोडमॅप तयार केला जाणार आहे. प्रस्तावित अभ्यासाकरिता सल्लागार नियुक्त करण्यासाठी येत्या 16 फेब्रुवारी रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत. पुढील 2 ते 3 महिन्यांत निविदा मंजूर होण्याची शक्यता आहे.

हार्बर मार्गावर जलद कॉरिडॉरची गरज

मुंबई आणि नवी मुंबई, पनवेलला जोडणाऱ्या हार्बर मार्गावर जलद कॉरिडॉरची मागणी जोर धरत आहे. त्या पार्श्वभूमीवर हार्बर मार्गावर जलद लोकलसाठी अतिरिक्त कॉरिडॉरचे काम करण्याची नितांत गरज आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वे वाहतूक क्षेत्रातील तज्ञ डॉ. पी.सी. सेहगल यांनी दिली.