जमिनीखाली चेंबर बनवून पूर्ण परीक्षा केंद्र हॅक, देशातील सर्वात मोठा हायटेक परीक्षा घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमिनीखाली चेंबर बनवून परीक्षा केंद्रच हॅक करायचे आणि पेपर रिमोटने सोडवायचे असा हायटेक परीक्षा घोटाळा करणाऱया टोळीचा पर्दाफाश उत्तराखंड पोलिसांनी केला.

उत्तराखंडमध्ये कर्मचारी निवड आयोगामार्फत आयोजित मल्टि-टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरती परीक्षेत तांत्रिक फेरफार करून पेपर फोडणाऱ्या रॅकेटला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. अॅण्टी-चिटिंग कायद्यांतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष परीक्षेवेळी घातलेल्या या छाप्यात तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांसह संपूर्ण सिस्टीम सील करण्यात आली आहे.

देहरादून येथील महादेव डिजिटल झोन या परीक्षा केंद्रावर जेव्हा एसटीएफने छापा टाकला, तेव्हा तिथला प्रकार पाहून पोलीसही चक्रावून गेले. तिथल्या यूपीएस रूममध्ये जमिनीच्या खाली 24 बाय 24 इंचाचे एक गुप्त चेंबर बनवण्यात आले होते. या चेंबरमध्ये दोन लॅपटॉप आणि राऊटर लपवून ठेवले होते. या उपकरणांच्या सहाय्याने बाहेरील व्यक्ती उमेदवारांचे कॉम्प्युटर रिमोट अॅक्सेसद्वारे हाताळून पेपर सोडवत होत्या. या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. गैरप्रकार उघड झाल्यानंतर संबंधित परीक्षा केंद्र सील करण्यात आले आहे.