
स्टँडअप कॉमेडी शो दरम्यान कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ‘गद्दार’ गीत गायले होते. यानंतर त्याच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आज कुणाल कामरा हक्कभंग समितीसमोर हजर झाला. विशेष म्हणजे, यावेळी त्याने संविधानाचा फोटो असलेले टी-शर्ट परिधान केले होते, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
कजय आहे प्रकरण?
कुणाल कामरा याने एका स्टँडअप कॉमेडी शो दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ‘गद्दार’ गीत गायले होते. या प्रकाराची दखल घेत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत कुणाल कामरा आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी स्वीकारल्यानंतर या प्रकरणाची चौकशी हक्कभंग समितीमार्फत सुरू आहे.
आज विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे उपस्थित राहिले होते. मात्र, मूळ तक्रारदार भाजप नेते प्रवीण दरेकर आज गैरहजर राहिल्याने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्च रोजी होणार असून, त्या दिवशी तक्रारदार आणि ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा दोघांचीही समोरासमोर साक्ष नोंदवली जाईल.
समितीसमोर हजेरी लावल्यानंतर माध्यमांशी बोलताना कुणाल कामरा म्हणाला, “मी संविधानाला मानतो. आज समितीसमोर हजर झालो होतो, पण सुनावणी होऊ शकली नाही. पुढच्या सुनावणीलाही मी नक्की येईन. माझ्यावर जे आरोप ठेवण्यात आले आहेत, त्यावर मी त्या वेळी योग्य ते उत्तर देईन.”


























































