
बेंगळुरूच्या सहकार नगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) ६५ वर्षीय माजी नागेश्वर राव यांनी त्यांच्या पत्नीची टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर हा अधिकारी पळून न जाता, पोलिसांच्या अटकेसाठी घरीच वाट पाहत थांबला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नागेश्वर राव आणि त्यांच्या पत्नी संध्या श्री (५६ वर्षी) यांच्यामध्ये घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि संतापाच्या भरात नागेश्वर राव यांनी घरात असलेल्या टॉवेलने पत्नीचा गळा आवळला. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर नागेश्वर राव यांनी स्वतः नियंत्रण कक्षाला (Control Room) फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, नागेश्वर राव आपल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ शांतपणे बसून पोलिसांची वाट पाहत होते. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हे दाम्पत्य गेल्या काही काळापासून कौटुंबिक वादाचा सामना करत होते. पती-पत्नीमध्ये सतत किरकोळ कारणांवरून खटके उडत असत. घटनेच्या दिवशीही अशाच एका वादामुळे नागेश्वर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
बेंगळुरू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी हा सुशिक्षित आणि प्रतिष्ठित संस्थेत वरिष्ठ पदावर काम केलेला व्यक्ती असल्याने, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून शेजारी आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत.

























































