प्रशासक राजवटीत झालेल्या खर्चाची ‘श्वेतपत्रिका’ काढा! शिवसेना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेने गेल्या चार वर्षात नगरसेवक पदावर नसताना विविध विकासकामांच्या नावाखाली खर्च केलेल्या हजारो कोटी रुपयांबाबत श्वेतपत्रिका काढून हिशोब द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्र दिले आहे.

मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत  7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर पालिकेमध्ये प्रशासक तथा आयुक्तांकडून कारभार हाकला जात होता. निवडणुका जाहीर होईपर्यंत सुमारे चार वर्षे प्रशासक सर्व निर्णय घेत होते. मात्र आता निवडणूक झाल्याने लोकप्रतिनिधींच्या नजरेखाली पालिकेचा कारभार सुरू राहणार आहे. मात्र प्रशासकाच्या राजवटीत घेतले गेलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे प्रशासकाच्या राजवटीत झालेल्या कामांवरील खर्चाचा हिशेब देण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.