
कॅन्सर, त्वचारोग आणि पोटाच्या विकारांसह अनेक आजारांना निमंत्रण देणारे प्लॅस्टिक कप, थर्माकोल ग्लासवर बंदी घाला, अशी मागणी शिवसेनेने केली. पालिकेकडे केली आहे. याबाबत शिवसेना नगरसेविका पद्मजा चेंबूरकर यांनी महासभेत ठरावाची सूचना मांडली.
चेंबूरकर यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत नमूद केले आहे की, प्लॅस्टिकचा सर्व स्तरांमध्ये अनियंत्रित वापर होत असून विशेषतः चहाच्या टपऱयांवर प्लॅस्टिक कोटिंग असलेले कागदी कप आणि थर्माकोल ग्लास मोठय़ा प्रमाणावर वापरले जातात. गरम चहा अशा कपांमध्ये दिल्यास सूक्ष्म प्लॅस्टिक कण व घातक रसायने चहामध्ये मिसळण्याची शक्यता असते. यामुळे हार्मोन्सचे असंतुलन, पचनसंस्थेचे विकार, त्वचारोग तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
पूर, अस्वच्छतेचा धोका
प्लॅस्टिक कप, ग्लास वापरून झाल्यानंतर नाल्यांमध्ये टाकल्यामुळे नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. परिणामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन परिसरात अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या वाढतात. त्यामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.



























































