
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षांचा कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांनी सुनावली. महेश वसंत गलांडे (वय 39, रा. नागाचे कुमठे, ता. खटाव) असे त्याचे नाव आहे.
दि. 23 डिसेंबर 2018 रोजी आरोपी महेश गलांडे याने मित्राबरोबर झालेल्या बोलण्याच्या रेकॉर्डिंगची भीती घालून फिर्यादीकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास फिर्यादीने नकार दिल्यावर मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला, तसेच धमकी देत वारंवार अत्याचार केला. त्यात फिर्यादी आठ महिन्यांची गर्भवती असल्याबाबतच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकार पक्षाच्या वतीने 12 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब – जबाब, कागदोपत्री व वैद्यकीय पुरावे, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी महेश गलांडे यास बाललैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कलमान्वये 20 वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंड ठोठावला. तसेच 50 हजार रुपयांपैकी 25 हजार पीडितेस नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
याबाबत औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला चालविण्याकामी पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले, तसेच पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे हवालदार जयवंत शिंदे, हवालदार विजयालक्ष्मी दडस, आमीर शिकलगार, सागर सजगणे यांनी सहकार्य केले.


























































