बांधकामांचे नियम धाब्यावर बसवत बेलगाम झालेल्यांवर कठोर कारवाई करणार का? अनिल परब यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रदूषण रोखण्याबाबत सरकारने कठोर नियम करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अॅड. अनिल परब यांनी केली. त्यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात मुंबईतील प्रदूषणाबाबतचा प्रश्न उपस्थित केला.

अनिल परब म्हणाले की, आम्ही जी माहिती सभागहात सादर केली ती विश्वासार्ह नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, आम्ही सांगत असलेली माहिती ऑथेंटिक आहे. राज्य सरकारच्याच एमपीसीबी ह्या संकेतस्थळावरून घेतली आहे. जर त्या संकेतस्थळावर दिलेली माहिती चुकीची असेल तर तुम्ही त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार?, असा सवालही त्यांनी केला. एमपीसीबी ही शासनाची साईट असल्याने त्यावरील माहिती ऑथेंटिक मानली जायला हवी, जर तसे नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला. या माहितीचे व्हेरिफिकेशन व्हायला हवे.

शहरात बांधकामे, तोडकामे करताना कोणतेही नियम पाळले जात नाही. काही बिल्डर, कंत्राटदार कोणालाच जुमानायला तयार नाही. कोणतेही पर्यावरणाबाबतचे निम न पाळता त्यांची कामे सुरू आहेत. अशा बेलगाम बिल्डरांना चाप लावणार का? त्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्या, असेही परब म्हणाले. मुंबईतील सर्वाधिक वायुप्रदूषण खेरवाडी विभागात आहे. येथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु आहे. ह्या बांधकामांबाबत नियम कठोर करून ते नियम न पाळणाऱ्यांवर आपण कठोर कारवाई करणार का? असा सलाव त्यांनी उपस्थित केला.