
>> वैश्विक, [email protected]
पाश्चात्त्य जगातली नित्यनवी ‘परिभाषा’ नेटसारख्या साधनांमुळे जगभर पसरते, तीही काही क्षणात. अगदी साधी गोष्ट, इंग्लिशमधलेच बरेचसे शब्द संक्षिप्त होऊन (ऑब्रिव्हिएटेड) इतक्या चटकन रूढ होतात की, इंग्लिश लोकांच्या जुन्या पिढीलाही ते काही काळ अनाकलनीय वाटतात. उदा. प्रेसिडेन्टचं ‘प्रेझ’ किंवा प्रिन्सिपॉलचं ‘प्रिन्सी.’ काही संकल्पना नव्याने येतात आणि त्यातून नवे वाक्प्रचार जन्म घेतात. ‘प्लेनेट परेड’ हा त्यातलाच प्रकार.
आपल्या सौरमालेत पृथ्वीसह सर्व ग्रह आपापल्या गतीने सूर्याभोवती फिरतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अशा वेळी, एका ‘वस्तू’भोवती, लंबवर्तुळाकार कक्षेत विशिष्ट अंतरावरून ठराविक गतीने फिरणाऱ्या अनेक इतर वस्तू केव्हातरी त्या मध्यभागी असलेल्या ‘वस्तू’च्या जवळ जाणार आणि दूर होणार. तसेच त्या परस्परांच्याही कधी जवळ तर कधी दूर असणार याची फिरती प्रतिकृती किंवा ग्राफिकच्या माध्यमातूनही नीट माहिती मिळते. परंतु आपली पृथ्वीच आपल्याला धड समजलेली नसेल तर बाकीच्या ग्रहांची आणि ग्रहगतींची काय कथा! मात्र नव्या पिढीत त्याचं कुतूहल गेल्या चार दशकांमध्ये खूप वाढलंय हे आम्ही खगोल-संस्था म्हणून अनुभवलंय.
त्यामुळेच अवकाशस्थ ‘वस्तू’ असलेल्या सूर्य नावाच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या सर्व, ग्रह नावाच्या वस्तूंच्या परिभ्रमणाची पूर्ण कल्पना खगोलीय कार्यक्रमात वारंवार स्पष्ट केली जाते. दुर्बिणीतून या ग्रहांचं दर्शनही घडवलं जातं. आपली पृथ्वी, आपली ग्रहमाला, आपला सूर्य आणि अंतिमतः आपलं विश्व नेमकं कसं आहे याची थोडीशी तरी कल्पना त्यातून येते आणि ‘ग्रहां’बद्दलचे धास्तीचे मानसिक ‘ग्रह’ (समजुती) दूर व्हायला मदत होते. हे काम सौम्य, पण ठामपणाने करता येतं. त्यातून तरुणांमध्ये संशोधक वृत्तीही वाढते.
तसं, ग्रहगणिताचं सखोल ज्ञान आपल्या आणि इतर अनेक संस्कृतीमध्ये पूर्वापार आहे. आपल्याकडचा आर्यभट्टांचा ‘सूर्यसिद्धांत’ हा ग्रंथ अनेक शतकं अवकाशस्थ ग्रह-नक्षत्राचं गणित समजण्यासाठी प्रसिद्ध होता. हिंदुस्थानातील अनेक ‘पंचांगा’चा आधार होता. आता हे ग्रहगणित किंवा ‘एफिमेरिज’ नेटवर सहज उपलब्ध असतं. त्याद्वारे मागच्या आणि पुढच्या काही हजार वर्षांचीही ग्रहस्थिती समजते. याउपर, विश्वाचा वेध घेणारे अवकाशी ‘डोळे’ (दुर्बिणी) आपण प्राप्त केल्याने प्राचीन ज्ञानात आधुनिकतेची भर पडते. ‘पूर्वी सगळं होतंच’ असं मोघम न सांगता, काय होतं त्याचा अभ्यास आणि त्यात काळानुसार पडत गेलेली भर तंत्रज्ञानाची मदत याचाही साकल्याने अभ्यास करून त्याची जोड द्यावी लागते. विज्ञान हा केवळ अभिनिवेशाचा नव्हे तर ‘अभ्यासा’चा विषय असतो. समर्थांनी म्हटल्यानुसार, ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हेच खरं.
यावेळी हे सुचण्याचं कारण म्हणजे बरेच ग्रह सध्या सूर्याच्या एका बाजूला दिसत असून त्याला पाश्चात्यांनी (आणि म्हणून आपल्याकडेही) ‘प्लॅनेट परेड’ असं म्हटलंय. ही ‘परेड’ आणखी काही काळ संध्याकाळच्या आकाशात दिसायला हरकत नाही. गेल्या 14 तारखेच्या (फेब्रु.) निरीक्षणाच्या वेळी आकाशस्थिती प्रदूषणाने बिघडवली. त्यामुळे सध्या परमइनांतराच्या जवळ असलेला म्हणजे सूर्यापासून जास्तीत जास्त दूर जात असलेला बुध ग्रह (लंबवर्तुळाकार कक्षेमुळे) सायंकाळी क्षितिजापासून सुमारे 18 अंशावर आला. निरभ्र, प्रदूषणमुक्त अवकाशात काळोख्या सांजवेळी आम्ही दुर्बिणीतून त्याचं ‘दर्शन’ पूर्वीही छान घेतलं होतं. शुक्र तेजस्वी असूनही धुरकटच दिसला. ही प्रदूषणाची ‘कृपा’!
त्यानंतर अनेक कडय़ांनी वेढलेला सुंदर शनी आणि माथ्यावरच मोठा गुरू तसंच युरेनस-नेपच्युन होते. यापैकी शनी-गुरू दुर्बिणीतून मोहक दिसणारेच ग्रह. गुरूचे चार चंद्र आणि शनीची कडी पाहणं ही पर्वणीच. शुक्राचा परावर्तित प्रकाशही शक्तीशाली म्हणजे 10 ते 12 इंच व्यासाच्या आरशाच्या दुर्बिणीतून दिसतो आणि युरेनस-नेपच्युन यांच्या छोटय़ा ‘चकत्या’ ही (डिस्क) स्पष्ट जाणवतात.
या सर्व गोष्टी आज-उद्या-परवा अगदी आठवडाभर पाहायला मिळतील पण, आकाशात चंद्रप्रकाश, प्रदूषण आणि पृथ्वीवरच्या दिव्यांचा झगमगाट नसला तरच. बालकवींच्या ‘सायंकाळची शोभा’ या कवितेत म्हटलंय ‘संध्येच्या खिडकीत येऊनि ही हसरी तारा, हळूच पाहते खुणाविते ही या कोणाला?’ उत्तर असं की, अवकाश निरीक्षण करणाऱ्या सर्वानाच ग्रह ताऱ्यांच्या निरीक्षणात रात्र आनंददायी आणि नकळत होणाऱ्या अभ्यासात जाते. तेव्हा शक्यतो या काळात ‘ग्रहांची परेड’ पाहायचा प्रयत्न करा. यात ग्रह ‘परेड’सारखे शिस्तीत ‘उभे’ असतील अशी कल्पना मात्र खरी नाही. ते त्यांच्या त्यांच्या कक्षेतच, परंतु एकाच वेळी दिसतील. पूर्वी अशी ‘पंचग्रही’, ‘अष्टग्रही’ झाली की उगाच धास्तीचं वातावरण पसरायचं किंवा पसरवलं जायचं. सूर्य, ताऱ्यासह सारे ग्रह पृथ्वीचे सखेसोबतीच आहेत. ते सारे एखाच बाजूला आले तरी त्यांचं वस्तुमान प्रचंड सूर्याच्या जेमतेम दोन टक्केच भरतं. त्यामुळे धास्ती नको. अशा अवकाशी घटना गेल्या चार दशकांत आम्ही वारंवार अनुभवल्या आणि हजारो प्रेक्षकांना दाखवल्या आहेत. तेव्हा ‘परेड’ वगैरे जाऊ द्या. पण ग्रहदर्शन करायला काय हरकत आहे!






























































