‘पॉपकॉर्न’अस्वस्थ करणारा नाट्यप्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॉपकॉर्न हे महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक डॉ. विवेक बेळे यांचे दोन अंकी नाटक पॉर्नोग्राफी, कुटुंब आणि हरवलेला संवाद या गुंतागुंतीच्या प्रश्नांना भिडतं. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण मुलाचा पॉर्न व्यवसाय उघडकीस आल्यानंतर बाप-लेकांतील तणाव, सामाजिक दबाव आणि नात्यांतील गुंता उलगडत जातो.

हे नाटक पॉर्न उद्योगातील पैसा, कायदे, व्यसन, नातेसंबंध आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचा अनेक अंगांनी विचार करतं. मात्र कोणतीही सरळ, सोपी उत्तरं देत नाही. रंजक मांडणी, उपदेशरहित शैली आणि विनोदाच्या सूक्ष्म वापरामुळे प्रयोग लक्षवेधी ठरतो. डॉ. विवेक बेळे यांच्या आधीच्या ‘माकडाच्या हाती शँपेन’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ या नाटकांप्रमाणेच अनपेक्षित वाटावळणं घेत जाणारं हे नाटक उत्कंठा वाढवणारं आहे.

पात्रांच्या परस्परसंबंधातून संवादाची गरज अधोरेखित करणारं हे नाटक पालक-मुलांमधील लैंगिक विषयांवरील मोकळा संवाद ही काहीशी बोल्ड थीम अतिशय संयतपणे मांडतं. ते हसता हसवता, विचार करायला भाग पाडतं आणि अस्वस्थ करत तुम्हाला पडलेले प्रश्न सोडवत जातं. आनंद इंगळे हा अवघा रंगमंच व्यापून टाकणाऱ्या अभिनेत्याला अंबर गणपुले, श्रीकर पित्रे, दीप्ती लेले, गौरी देशपांडे, गायत्री देशपांडे, नितीन अग्निहोत्री, अर्णव वॉरियर, सचिन जोशी या कलाकारांनी समर्थ साथ दिलीय.