फिटनेस इन्फ्लुएन्सर रोशन भजनकरचा बिग बॉसच्या घरातून प्रवास संपला; शनिवारीच झाले एलिमिनेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये सध्या अनपेक्षित वळणे पाहायला मिळत असून प्रेक्षकांसाठी या आठवड्याचा निकाल अत्यंत धक्कादायक ठरला आहे. दरवेळेस रविवारी होणारी एलिमिनेशनची प्रक्रिया यावेळेस चक्क शनिवारीच पार पडली आणि यात लोकप्रिय फिटनेस इन्फ्लुएन्सर रोशन भजनकर याला घराबाहेर पडावे लागले आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी रोशन भजनकरसह राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे आणि राखी सावंत हे चार तगडे स्पर्धक नॉमिनेट झाले होते.

सुरुवातीला सोशल मीडियावरील विविध ट्रेंड्स आणि चर्चा पाहता रोशनला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी समोर आल्यावर रोशन इतर स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडल्याचे स्पष्ट झाले. ‘भाऊच्या धक्क्यावर’ रितेश देशमुख यांनी या निकालाची घोषणा केली तेव्हा घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला.