Israel Iran War – इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू, अहमद वाहिदींकडे IRGC ची जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात खामेनी यांच्या कुटुंबाचाही खात्मा झाला असून, खामेनी यांचे जावई आणि सून, मुलगी आणि नातवाचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर इराणने तातडीने अहमद वाहिदी यांची ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) च्या कमांडर-इन-चीफ पदी नियुक्ती केली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी त्यांची डेप्युटी कमांडर म्हणून निवड झाली होती, यानंतर आता त्यांच्याकडे देशाच्या लष्कराची सर्व सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

अहमद वाहिदी हे इराणच्या लष्करी रणनीतीचे ‘मास्टरमाइंड’ मानले जातात. 1988 ते 1998 या काळात त्यांनी ‘कुद्स फोर्स’चे पहिले कमांडर म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी इराणचे संरक्षणमंत्री आणि सुप्रीम नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. 27 जून 1958 रोजी शिराज येथे जन्मलेले वाहिदी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असून त्यांनी Strategic Studies मध्ये पीएचडी केली आहे.

नवे कमांडर-इन-चीफ अहमद वाहिदी यांचा इतिहास वादांनी वेढलेला आहे. 1994 मध्ये अर्जेंटिनातील ब्युनस आयर्स येथील ज्यू केंद्रावर झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या आरोपामुळे त्यांचे नाव इंटरपोलच्या ‘रेड नोटिस’ यादीत आहे. या स्फोटात 85 जणांचा बळी गेला होता. याशिवाय, इराणचा अणू कार्यक्रम आणि 2022 मधील जनआंदोलनांवेळी झालेल्या मानवाधिकार उल्लंघनांच्या आरोपांमुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले आहेत.

खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये सध्या शोकाकुल वातावरण असून राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तेहरान सिटी कौन्सिलच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सर्वोच्च नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही जीव गमवला आहे. आता अहमद वाहिदी यांच्या नेतृत्वाखाली इराण इस्रायल आणि अमेरिकेच्या या कारवाईला कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू; इराणी माध्यमांची पुष्टी, 40 दिवसांचा शोक जाहीर