
इस्रायल-अमेरिका आणि इराणध्ये घनघोर युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूने क्षेपणास्त्रांचा मारा केला जात असून जगावर तिसऱ्या युद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत. रविवारी इस्रायल-अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. त्यानंतर इराणने आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, इराण-इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी आणि त्यांचे कुटुंब ठार झाले. मोदी दोन दिवसांपूर्वी इस्रायलमधून आले. हिंदुस्थानच्या जागतिक धोरणाला बसलेला हा धक्का आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा शोक जाहीर केला आहे. इराण हिंदुस्थानचा मित्र होता, इस्रायलही आले. इराणने संकट काळात हिंदुस्थानला अनेकदा मदत केलेली आहे. कश्मीरच्या प्रश्नावर खुलेपणाने उभा राहिलेला देश म्हणजे इराण आहे. इराण हिंदुस्थानला अत्यंत स्वस्त दरामध्ये तेल देत होता. इराणने हे मैत्रीचे नाते कायम जपले. इराणने हिंदुस्थानशी कायम मित्रत्वाचे नाते ठेवले. या युद्धा संदर्भात हिंदुस्थानने एक भूमिका घेणे आवश्यक होते.
ते पुढे म्हणाले की, मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे फार जवळचे मित्र आहेत. एकमेकांना मिठ्या मारताना काल आम्ही त्यांना पाहिले. जर हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध हे ट्रम्पने थांबवले असे ते म्हणतात, तर इराणला वाचवण्याची जबाबदारी मोदी यांची होती. ही युद्ध थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे असे त्यांच्या संमर्थकांना वाटते.
इराणवर बॉम्ब हल्ले झाले, लहान मुलांच्या हत्या झाल्या, खामेनींचे कुटुंब त्यांच्या नातवासह मारले गेले. हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण, हिंदुस्थानचे नेतृत्व काय करत होते? हे युद्ध त्यांनाही थांबवता आले असते, असे भाजप-मोदींच्या समर्थकांचे म्हणणे आहे. जर हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात, तर इस्रायल-इराणचे युद्ध मोदी का थांबवू शकले नाहीत? याचे उत्तर भाजपने, सरकारने द्यावे अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
जागतिक राजकारणासाठी आणि मध्य पूर्व आशियातील स्थैर्यासाठी अत्यंत वाईट घटना आहे. इराणचे कमजोर होणे हे हिंदुस्थानसाठीही अत्यंत घातक आहे. कारण ज्या पद्धतीने इराणवर अमेरिका आणि इस्रायल ताबा घेईल, हळूहळू ही पावलं हिंदुस्थानच्या दिशेने पडू शकतात. नेतन्याहू आज आहेत, उद्या नसतील. पण हिंदुस्थान हा महान देश आहे. आधीच मोदींनी अमेरिकेबरोबर केलेल्या ट्रेड डीलमुळे हिंदुस्थान हा अमेरिकेचा गुलाम झालेला आहे, असेही राऊत म्हणाले.
अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्धामध्ये ट्रम्प पूर्णपणे पाकिस्तानला मदत करत आहेत. पाकिस्तानला अर्थसहाय्य, क्षेपणास्त्र, शस्त्र पुरवण्याचे काम ट्रम्प करत आहेत. प्रे. ट्रम्प यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धात पाकिस्तानचे पंतप्रधान आणि जनरलच्या शौर्याचे कौतुक केले आहे. याच्यावरही हिंदुस्थानच्या परराष्ट्र खात्याकडून साधे निषेधाचे शब्द बाहेर पडले नाहीत. मग हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण काय आहे? जागतिक भूमिका काय आहे? की फक्त परदेशात जाऊन फिरायचे आणि नेत्यांना मिठ्या मारून फोटो काढायचे हेच आहे का? असा सवाल राऊत यांनी केला.
पाकिस्तान-अफगाणिस्तान, इराण-इस्रायल, इराण-दुबई, इराण आणि अमेरिका हे युद्ध हिंदुस्थानच्या दारापर्यंत आले आहे. या युद्धामुळे हिंदुस्थानची आर्थिक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे हिंदुस्थानच्या सीमेवरील भूगोल बदलण्याची शक्यता आहे आणि या युद्धामुळे हिंदुस्थानला चटके बसण्याची शक्यता आहे. तरीही मोदी या युद्ध काळात इस्रायलला गेले आणि दुसऱ्या दिवशी इराणवर बॉम्ब पडले. जागतिक स्तरावर हिंदुस्थानची नाचक्की झाली आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
























































