Israel Iran War – इराणने अमेरिकेचा पर्शियन आखातात प्रवेश रोखला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद; तेलाच्या किमती भडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणने अमेरिकेचा पर्शियन आखातात प्रवेश रोखला आहे, तसेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे जगाचा तेलपुरवठा खंडित होणार असून तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात भडकणार असून जगभरात महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदुस्थान, चीन, ब्राझीलसारख्या देशांना याचा मोठा फटका बसणार आहे. या देशांना या मार्गानेच सर्वाधिक तेलपुरठा होत असल्याने पुन्हा जगावरील तेलपुरठ्याचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे जागतिक तेल आणि नासर्गिक वायू पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यातच इराणने अमेरिकन जहाजांसाठी पर्शियन आखात बंद केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग इराणने बंद केल्याने जागतिक व्यापारावर आणि हिंदुस्थानवरही त्याचा परिणाम होईल.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. त्यामुळे आखाती देशात तणाव वाढला आहे. या युद्धाचा परिणाम फक्त आखाती देशासाठी मर्यादित नाही, त्याची तीव्रता जगभरात जाणवत आहे. इराणने एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे जागतिक व्यापाराला धोका निर्माण झाला आहे. इराणचा एक प्रॉक्सी गट असलेल्या येमेनच्या हुथी बंडखोरांनीही इराणच्या समर्थनार्थ लाल समुद्रात आणि इस्रायलमध्ये जहाजांवर हल्ला करण्याची घोषणा केली आहे.

इराणी अधिकारी मोहसेन रेजाई यांनी जाहीर केले आहे की पर्शियन आखातात अमेरिकन जहाजांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. रेजाई यांनी सांगितले की अमेरिकन जहाजांना आता पर्शियन आखातात प्रवेश दिला जाणार नाही. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना VHF रेडिओ इशारा जारी केला. या इशारामध्ये असे म्हटले होते की, आता कोणतीही जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ते धोकादायक आहे. IRGC च्या इशाऱ्यामुळे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक ७०% ने कमी झाली आहे आणि अनेक टँकरने त्यांचे मार्ग बदलले आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील हे युद्ध जागतिक ऊर्जा बाजारपेठेत तेलपुरवठ्यात बाधा आणू शकते. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि नैसर्गिक वायू निर्यात मार्ग आहे.

इराण आणि ओमान यांच्यामध्ये स्थित होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते. ही एक अतिशय अरुंद सामुद्रधुनी आहे, एका वेळी त्याची रुंदी फक्त २१ मैल (अंदाजे ३४ किलोमीटर) आहे. सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि कुवेत सारख्या प्रमुख तेल उत्पादकांसाठी हा मार्ग मुख्य निर्यात मार्ग आहे. दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे आणि शुद्ध तेल या अरुंद समुद्रमार्गातून जाते, जे जागतिक तेल वापराच्या अंदाजे एक पंचमांश आहे. जर हा पुरवठा विस्कळीत झाला तर हिंदुस्थान, चीनसह प्रमुख आशियाई अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होईल.