Israel Iran War – इराणची गर्जना! बोगद्यांमध्ये साठवलेले ड्रोन, शस्त्रास्त्रे दाखवत इस्रायल, अमेरिकेला दिले आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराणनेही प्रतिहल्ला चढवल्याने आता युद्धाची तीव्रता वाढली आहे. या युद्धात आता इराणही सर्वशक्तीनिशी उतरल्याचे दिसत आहे. इस्रायल,अमेरिका इराण युद्ध व्यापक होत असताना इराणने आपल्या लष्करी सामर्थ्याचा एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था FARS ने जमिनीखाली बांधलेल्या बोगद्यांमध्ये ड्रोनचा प्रचंड साठा दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत इराने इस्रायल आणि अमेरिकेला आव्हान दिल्याचे मानण्यात येत आहे.

अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेला हा साठा दाखवत इराणने अमेरिका आणि इस्रायलला थेट इशारा दिला आहे. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की इराणने पर्वताखाली शेकडो मैल लांब बोगद्यांचे जाळे तयार केले आहे. तिथे अनेक विध्वंसक ड्रोन रांगेत उभे आहेत. हे ड्रोन अत्याधुनिक रॉकेट लाँचरवर ठेवलेले आहेत, जे कोणत्याही क्षणी उडण्यास तयार असल्याचे दिसते.

बोगद्यांच्या भिंती इराणी ध्वजांनी आणि दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या मोठ्या चित्रांनी सजवल्या आहेत. ते इराणच्या धार्मिक आणि लष्करी दृढनिश्चयाचे प्रतिबिंब आहेत. हा व्हिडिओ प्रसारीत करत इराणने आपले ड्रोन नेटवर्क आणि प्रत्युत्तर क्षमता दाखवून दिली आहे. हा संदेश अमेरिका आणि इस्रायलला थेट इशारा म्हणून पाहिला जात आहे. इराणकडे व्यापक आणि अनेक लष्करी पर्याय असल्याचे व्हिडीओतून दाखवण्यात आले आहे. जोरदार हल्ले होऊनही, इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता कमी झालेली नाही. यापेक्षा अधिक क्षमतेने प्रतिहल्ले करण्याची क्षमता असल्याचे दाखवून देणे, हाच या व्हिडीओचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.