Tamilnadu Election 2026 – डीएमके आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला! लवकरच अधिकृत घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी डीएमके (DMK) आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी डीएमके (DMK) आणि काँग्रेसमधील आघाडीची औपचारिकता आज पूर्ण झाली आहे. अनेक दिवसांपासून रखडलेला जागावाटपाचा पेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यातील चर्चेनंतर सुटला आहे. दोन्ही नेत्यांनी बुधवारी सकाळी फोनवरून संवाद साधत जागावाटपावर अंतिम मोहोर उमटवली.

विधानसभेच्या २३४ जागांपैकी जागावाटपात काँग्रेसला २८ जागा देण्यात आल्या आहेत. यासोबतच डीएमकेने काँग्रेसला एक राज्यसभेची जागा देण्याचेही मान्य केले आहे. सुरुवातीला काँग्रेस ३५ जागांसाठी आग्रही होती, तर डीएमके २५ पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नव्हती. मात्र, होळीच्या मुहूर्तावर खरगे आणि स्टॅलिन यांच्यात झालेल्या चर्चेने हा तिढा सोडवला, असे वृत्त आज तकने दिला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत डीएमकेने काँग्रेसला २५ जागा दिल्या होत्या. यापैकी १८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. यंदा काँग्रेसने ३५ विधानसभा आणि २ राज्यसभा जागांची मागणी केली होती. परंतु, डीएमकेने आपली भूमिका ताठर ठेवत २५ पेक्षा जास्त जागा देण्यास नकार दिला होता. अखेर ३ जागा वाढवून देत जागावाटप निश्चित करण्यात आले. या निर्णयामुळे तामिळनाडूच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने आपली स्थिती स्पष्ट केली असून लवकरच संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.