
नागपूर जिल्ह्यातील कोराडी गावामध्ये होळीच्या दिवशी एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. खेळताना अंगावर रंग उडवला या रागातून आजीने आपल्या 4 वर्षांच्या नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतले. ही घटना 3 मार्च रोजी कोराडीतील आदर्शनगरमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये भागात घडली. हा संतापजनक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, ओम हरिश वांगे (वय – 4) हा होळी निमित्ताने घराबाहेर रंग खेळत होता, तर त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडांवर तापवलेले पाणी बादलीत भरात घराकडे घेऊन येत होत्या. यावेळी खेळता खेळता ओमने अल्लडपणाने आजीच्या अंगावर पिचकारीने रंग उडवला. नातवाने रंग उडवल्याचा आजीला प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी बादलीतील उकळते पाणी त्याच्या अंगावर ओतले.
View this post on Instagram
उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे ओम कंबरेखाली गंभीररित्या भाजला आहे. त्याला नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो 45 टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सिंधू ठाकरे या चॉकलेटी रंगाची साडी नेसून होळीच्या लाकडांवर तापवलेले पाणी बादलीमध्ये भरून घराकडे येताना दिसत आहेत. याचवेळी त्यांचा 4 वर्षांचा नातू ओम हा घरातून पिचकारी घेऊन बाहेर येतो आणि आजीच्या अंगावर थोडा रंग उडवतो. अंगावर रंग उडवल्याचा राग आल्याने आजी ओमच्या अंगावर बादलीतील गरम पाणी ओततात. अंगावर गरम पाणी पडल्याने ओम तिथेच वेदनेने विव्हळत थयथय नाचू लागतो. यावेळी तिथेच बाजुला उभी असलेली तरुणी आपल्या हातातील बादलीतील थंड पाणी ओमच्या अंगावर टाकते. यावेळी चूक झाल्याचे लक्षात येताच आजी तरुणीच्या हातातील थंड पाण्याने भरलेली बादली ओमच्या अंगावर ओततात.
रंगावरून राडा, 11 जखमी
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात होळी खेळण्यावरून दोन गटात हिंसक हाणामारी झाली. रंगावरून सुरू झालेला शाब्दिक वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना काठ्या आणि लोखंडी सळयांनी मारहाण केली. यात 11 जण जखमी झाले आहेत.
























































