Israel Iran War – हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत इराणची युद्धनौका बुडवली जाते आणि तरीही पंतप्रधान गप्प आहेत, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता हिंदुस्थानच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. श्रीलंका किनारपट्टीजवळ अमेरिकन पाणबुडीने हल्ला करत इराणची युद्धनौका बुडवली. या घटनेनंतर देशात राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाने या घटनेला हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावर तीव्र सवाल उपस्थित केले आहेत.

हिंदी महासागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून अवघ्या ४० नॉटिकल मैल अंतरावर अमेरिकन नौदलाने इराणी युद्धनौका बुडवली. या घटनेमुळे हिंदुस्थानच्या धोरणात्मक वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि जयराम रमेश यांनी ही घटना हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आणि ऊर्जा सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी देशाला सावध करताना म्हटले की, “जग सध्या अत्यंत अस्थिर टप्प्यातून जात आहे. आपली ४० टक्क्यांहून अधिक तेल आयात होर्मुजच्या सामुध्रुधुनीतून होते. आता युद्ध आपल्या दारापर्यंत पोहोचले आहे. आपल्या सागरी हद्दीत इराणी जहाज बुडवले जाते आणि तरीही पंतप्रधान गप्प आहेत. हिंदुस्थानला आज एका कणखर नेतृत्वाची गरज आहे, अशा पंतप्रधानांची नाही ज्यांनी आपल्या धोरणात्मक स्वातंत्र्याशी तडजोड केली आहे.”

काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. त्यांनी ट्विट केले की, “ज्या इराणी युद्धनौकेला अमेरिकेने बुडवले, ती नौका काही दिवसांपूर्वीच (१९-२५ फेब्रुवारी २०२६) विशाखापट्टणम येथे हिंदुस्थानी नौदलाच्या ‘मिलान’ या युद्धअभ्यासात सहभागी झाली होती. हे जहाज हिंदुस्थानचे पाहुणे होते. आपल्या सागरी क्षेत्रातून बाहेर पडताच त्याला लक्ष्य केले जाणे हे धक्कादायक आहे. मोदी सरकारचे मौन हे ते घाबरले असल्याचे लक्षण आहे.”