ओमानमध्ये अडकलेल्या ब्रिटीश नागरिकांच्या सुटकेचा प्रयत्न फसला, सरकारने पाठवलेल्या विमानात तांत्रिक बिघाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक ब्रिटिश नागरिक ओमानमध्ये अडकून पडले आहेत. या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने विमान पाठवले. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने आणि वैमानिकांच्या विश्रांतीच्या नियमांमुळे ते रद्द करण्यात आले. ओमानमध्ये अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांच्या सुटकेचा हा प्रयत्न फसल्याने मस्कत विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला.

मस्कतमध्ये अडकलेल्या नागरिकांना घेण्यासाठी चार्टर्ड विमान आले होते. मात्र, प्रचंड विलंबामुळे वैमानिकाला अनिवार्य विश्रांती घेणे गरजेचे असल्याने विमानाने उड्डाण केलेच नाही. विमानतळावर चेक-इन प्रक्रियेला 4 तास लागले. त्यानंतर प्रवाशांना बसमध्ये तब्बल दीड तास कोंडून ठेवण्यात आले. संतापलेल्या प्रवाशांनी बसच्या खिडक्या ठोठावण्यास सुरुवात केली, तर काही प्रवाशांना घाबरून ‘पॅनिक अटॅक’ आले.

विमानाजवळ किंवा बसमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे कोणतेही कर्मचारी मदतीसाठी उपस्थित नव्हते, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. आखाती देशांमध्ये सध्या सुमारे 1,38,000 ब्रिटीश नागरिकांची नोंद आहे. या विमानासाठी प्रत्येक प्रवाशाकडून 350 पाउंड (सुमारे 38,000 रुपये) आकारले जात आहेत. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सर्वाधिक 1.12 लाख नागरिक अडकले आहेत.

दरम्यान, ब्रिटीश सरकारने आठवड्याच्या अखेरीस आणखी दोन चार्टर्ड विमाने पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यूएईमधून 8 व्यावसायिक विमाने पाठवली जातील असे सांगितले आहे.