
हिंदुस्थानात इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. आपल्या देशात एक लिटर पेट्रोलसाठी 104 रुपये मोजावे लागत असताना आखाती देशांमध्ये मात्र पाण्यापेक्षाही स्वस्त दरात पेट्रोल उपलब्ध आहे. हिंदुस्थानात एक लिटर पाण्यासाठी देखील 20 रुपये मोजावे लागतात. मात्र आखाती देशांमध्ये एक लिटर पेट्रोल केवळ 3 रुपयांमध्ये मिळते.
इंधनाच्या किमती कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणाम करतात. हिंदुस्थानात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली असताना असे काही देश आहेत जिथे पेट्रोलची किंमत फक्त 2 ते 3 प्रति लिटर आहे. अनेक देशांमध्ये इंधनाचे दर अजूनही इतके कमी आहेत की त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. विशेषतः आखाती आणि तेल समृद्ध देशांमध्ये, सरकारे त्यांच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देतात.
इराण
स्वस्त पेट्रोलच्या बाबतीत इराण जगात अव्वल स्थानावर आहे. इराणमध्ये पेट्रोलच्या किमती 2.50 ते 3 प्रति लिटरपर्यंत आहेत. कमी किमतींमुळे इराणच्या शेजारील देशांमध्ये पेट्रोलची तस्करी वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी सरकारने आता कोटा प्रणाली लागू केली असून दरमहा 160 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल वापरणाऱ्यांना जास्त किंमत मोजावी लागते.
लिबिया
स्वस्त पेट्रोलच्या बाबतीत लिबिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर आफ्रिका आणि अरब लीगचा सदस्य असल्याने लिबियामध्ये सरासरी 2.64 रुपये प्रति लिटर या दराने पेट्रोल विकले जाते. हा देश जागतिक स्तरावर सर्वात कमी किमतीत इंधन पुरवतो.
व्हेनेझुएला
एकेकाळी जगातील सर्वात स्वस्त पेट्रोलचा पुरवठादार असलेला व्हेनेझुएला आता तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. येथे पेट्रोलचे दर प्रति लिटर सुमारे 3 रुपये आहे. व्हेनेझुएलामध्ये आता कोटा प्रणाली देखील लागू असून दरमहा पहिल्या 120 लिटर इंधनावरच अनुदान दिले जाते. जर एखाद्या नागरिकाने यापेक्षा जास्त पेट्रोल खरेदी केले तर त्यांना प्रति लिटर 40 रुपयेपर्यंत द्यावे लागू शकतात.
गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांचा विचार केला तर, कुवेत सर्वात स्वस्त पेट्रोल देते. कुवेतमध्ये पेट्रोलचे दर सुमारे 29 ते 30 रुपये प्रति लिटर आहेत.
इराक – सुमारे 29-30 रुपये प्रति लिटर
बहरीन – सुमारे 31-32 रुपये प्रति लिटर
कतार – सुमारे 48-49 रुपये प्रति लिटर
सौदी अरेबिया – सुमारे 50-51 रुपये प्रति लिटर
ओमान – सुमारे 53-54 रुपये प्रति लिटर
































































