देशात दररोज होतेय… 38 कोटींची आर्थिक फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात सायबर फ्रॉडच्या घटना वेगाने वाढत आहेत. देशात प्रत्येक 24 तासाला 38 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात आहे, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि अन्य डिजिटल सेवेचा वापर करताना सायबर गुन्हेगार लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. 38 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्यानंतर यातील केवळ 8 कोटी रुपये परत आणले जात आहेत. यामुळे लोकांच्या मेहनतीच्या पैशावर डल्ला मारणाऱया सायबर गुन्हेगाराला रोखण्यात केंद्र सरकारला सपशेल अपयश आल्याचे दिसत आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाशी जोडलेल्या सायबर सिस्टमच्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 7 हजारांहून अधिक तक्रारींची नोंद होत आहे. यातील जवळपास 6 हजार तक्रारींवर तत्काळ कारवाई केली जाते. यात दररोज 38 कोटी रुपयांची फसवणूक केली जाते. संबंधित एजन्सीकडून पैसा वाचवण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु यात सरासरी केवळ 8 कोटी रुपये रिकव्हर केले जातात. बाकीचे 30 कोटी रुपये सायबर गुन्हेगाराच्या खात्यात जातात. सायबर चोरांना धडा शिकवण्यासाठी गृह मंत्रालयाने एक विशेष सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर बनवले आहे. हे सेंटर 24 तास काम करते. या ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सींचे प्रतिनिधी हजर असतात. सायबर चोरीची माहिती मिळताच त्याविरुद्ध कारवाई करणे, पोलीस, बँक आणि टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत मिळून काम करणे हे या सेंटरचे काम आहे. 2025 मध्ये जवळपास 8 हजार 189 कोटी रुपये फसवणूक होण्यापासून वाचवले आहेत.

24 तास कंट्रोल रूम

सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरमध्ये हायटेक कंट्रोल रूम 24 तास काम करते. एखाद्या संशयित खात्यावर जास्त पैशांचे ट्रान्झक्शन मिळताच सायरन वाजते. यामुळे संबंधित एजन्सीज अलर्ट होतात. यानंतर बँक आणि पोलीस मिळून या ट्रान्झॅक्शला रोखण्याचा प्रयत्न होतो.

पाच वर्षांत 55 हजार कोटींची फसवणूक

गेल्या पाच वर्षांत सायबर चोरांनी लोकांच्या खात्यांतून 55 हजार कोटी रुपये परस्पर काढले आहे. हा आकडा 2021 ते 2025 मधील आहे. या पाच वर्षांत एकूण 6 कोटी 58 लाखांहून अधिक लोकांनी सायबर चोरांविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. या रिपोर्टनुसार, 2025 मध्ये सायबर गुन्हेगारींच्या 24 लाखांहून अधिक तक्रारींची नोंद झाली आहे.

    तक्रारी आणि फसवणूक

2021 2,62,846 तक्रारी 551 कोटींची फसवणूक

2022 6,94,446 तक्रारी 2290 कोटींची फसवणूक

2023 13,10,357 तक्रारी 7465 कोटींची फसवणूक

2024 19,18,835 तक्रारी 22,848 कोटींची फसवणूक

2025 24,02,579 तक्रारी 22,495 कोटींची फसवणूक