ई-चलानविरुद्ध राज्यभरातील वाहतूकदार रस्त्यावर, ठिकठिकाणी चक्का जाम; आझाद मैदानात सरकारविरोधात घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई-चलान प्रणालीद्वारे सुरू केलेल्या जाचक दंडवसुलीविरोधात राज्यभरातील वाहतूकदार गुरुवारी रस्त्यावर उतरले. मुंबई-पुणे महामार्ग तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ई-चलान प्रणालीचा निषेध आणि इतर मागण्यांसाठी अनेक वाहतूकदारांनी भर रस्त्यात ठिय्या मांडला. दुपारनंतर आझाद मैदानात हजारोंच्या संख्येत वाहतूकदार जमले आणि ‘नही चलेगी, नही चलेगी… तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत ऐन अधिवेशन काळात महायुती सरकारला हादरवून सोडले. आंदोलनाचा मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवला.

मोटार वाहन विभाग आणि पोलिसांमार्फत ई-चलान प्रणालीद्वारे दंडवसुली केली जात आहे. या माध्यमातून वाहनधारकांची अक्षरशः लूट आणि पिळवणूक सुरू असल्याचा आरोप करीत राज्यभरातील वाहतूकदार गुरुवारी रस्त्यावर उतरले. मुंबई-पुणे महामार्गावर कळंबोलीजवळ वाहतूकदारांनी जोरदार आंदोलन केले. पुणे जिह्यातून मोठय़ा प्रमाणावर वाहने दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाकडे कूच करीत होती. ती वाहने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करून मुंबईच्या वेशीवरच रोखण्यात आली. त्यामुळे वाहतूकदार आक्रमक झाले आणि सरकारविरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.

सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे

आझाद मैदानात हजारोंच्या संख्येत जमलेल्या वाहतूकदारांच्या आंदोलनाने महायुती सरकारचे धाबे दणाणले. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात या आंदोलनामुळे सरकारची चिंता वाढली. त्या पार्श्वभूमीवर येत्या आठवडाभरात ई-चलान प्रणाली व अन्य मागण्यांबाबत महाराष्ट्र ट्रान्सपोटर्स अॅक्शन कमिटी तसेच विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे कृती समितीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर कृती समितीने आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे जाहीर केले.

भाजीपाला व दुधाच्या पुरवठय़ावर परिणाम

आंदोलनामध्ये मोठय़ा प्रमाणावर ट्रक आणि टेम्पो मालकांनी सहभाग घेतला होता. त्याचा परिणाम मुंबई शहर आणि उपनगरांतील भाजीपाला व दुधाच्या पुरवठय़ावर झाला. बहुतांश भागांत भाजीपाला आणि दुधाच्या गाडय़ा पोहोचल्याच नाहीत. मुंबईकरांना त्याची झळ बसली. तसेच इतर सेवांवरही आंदोलनाचा परिणाम जाणवला. शिवडी, वाडीबंदर, वडाळा परिसरात शेकडो टेम्पो, ट्रक जागेवरच उभे राहिले होते. अन्यायकारक ई-चलान प्रणालीचा ट्रक-टेम्पोचालकांनी बंद पाळून निषेध केला.