
मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कुनो राष्ट्रीय उद्यानात ज्वाला नावाच्या मादी चित्त्याने सोमवारी पाच शावकांना जन्म दिला आहे. ज्वाला मादीला नामिबियावरून आणले होते. ज्वालाने तिसऱ्यांदा शावकांना जन्म दिला आहे. याआधी मार्च 2023 मध्ये पहिल्यांदा 4 शावकांना जन्म दिला होता, तर जानेवारी 2024 मध्ये 3 शावकांना जन्म दिला होता. आता एकूण पाच शावकांना जन्म दिल्याने चित्त्यांची संख्या वाढली आहे. या नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे कुनो राष्ट्रीय उद्यानात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
2022 मध्ये ज्वालाला हिंदुस्थानात आणल्यानंतर तिने येथील वातावरणाशी जुळवून घेतले. ज्वाला ही उद्यानातील सर्वात यशस्वी मादी चित्त्यांपैकी एक बनली आहे. सोमवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोशल मीडियावर ही गुड न्यूज शेअर केली आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी ‘प्रोजेक्ट चित्ता’ आणि वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक ऐतिहासिक यश म्हटलेय. ज्वाला आणि तिचे पाचही बछडे पूर्णपणे निरोगी आहेत. तज्ञांची टीम सीसीटीव्ही आणि मैदानी निरीक्षणाद्वारे ज्वाला व नवजात बछडय़ांच्या सुरक्षितेतवर, आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘प्रोजेक्ट चित्ता’साठी हा अभिमानाचा क्षण आहे. ज्वालाने तिसऱ्यांदा शावकांना जन्म दिल्याने हिंदुस्थानात जन्मलेल्या निरोगी पिल्लांची संख्या आता 33 झाली आहे, असे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूकेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टमध्ये म्हटले आहे.
गामिनीनेही दिली होती
आनंदाची बातमी
कुनो राष्ट्रीय उद्यानात गामिनी नावाच्या मादी चित्त्याने तीन गोंडस शावकांना 18 फेब्रुवारीला जन्म दिला होता. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना तीन वर्षे पूर्ण होत असताना ही गुड न्यूज मिळाली होती.



























































