
2025 च्या महाकुंभ मेळय़ामध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसले हिने आंतरधर्मीय विवाह करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मोनालिसाने तिचा बॉयफ्रेंड फरमान खान याच्यासोबत कोर्ट मॅरेज केले आहे. लग्नानंतर तिरुवनंतपुरमधील अरूमनूर नैनार मंदिरात जाऊन हिंदू पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोर्ट मॅरेजनंतर मॅरेज सर्टिफिकेट दाखवत मोनालिसाने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
मोनालिसा आणि फरमान खान यांच्यात जवळपास सहा महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होते, अशी माहिती लग्नानंतर फरमान खान याने दिली आहे. या लग्नाला मोनालिसाच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे या दोघांनी केरळला जाऊन हे लग्न केल्याची कबुली दिली आहे. लग्न केल्यानंतर मोनालिसा आणि फरमान यांनी तिरुवनंतपुरमच्या थंपानूर पोलीस स्टेशनला जाऊन संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. मोनालिसा आणि फरमान खान हे ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळला आले होते. त्या वेळी या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. सर्वात आधी मैत्री झाली आणि त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले, असे मोनालिसाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मोनालिसाला पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी या लग्नाला लव्ह जिहाद म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.


























































