
जगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी Adobe चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु नारायण यांनी 18 वर्षांहून अधिक काळ कंपनीत काढल्यानंतर, आता सीईओ पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा बदल तात्काळ होणार नसून कंपनीच्या संचालक मंडळाकडून नवीन सीईओची निवड होईपर्यंत नारायण पदावर कायम राहतील. त्यानंतर ते कंपनीच्या बोर्डाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. नारायण यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत मेलमध्ये हा निर्णय जाहीर केला. त्यांनी या टप्प्याला चिंतन करण्याची वेळ असे संबोधले.
नवीन सीईओ शोधण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने प्रमुख स्वतंत्र संचालक फ्रॅंक कल्डेरोनी यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती अंतर्गत तसेच बाह्य उमेदवारांचे मूल्यांकन करणार आहे. 2007 मध्ये शंतनु नारायण यांनी सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा Adobe मध्ये सुमारे ३ हजार कर्मचारी होते. कंपनीचे वार्षिक उत्पन्न 1 अब्ज डॉलरपेक्षा कमी होते.
आज कंपनीमध्ये 30 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि वार्षिक महसूल 25 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या शेअरची किंमतही सहापट वाढली आहे. नारायण यांच्या नेतृत्वाखाली Adobe ने पारंपरिक सॉफ्टवेअर परवाना प्रणाली सोडून सबस्क्रिप्शन-आधारित मॉडेल स्वीकारले. कंपनीने Adobe Creative Cloud सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे Software as a Service मॉडेलवर मोठा भर दिला. यामुळे Adobe आज जगातील सर्वात मोठ्या SaaS कंपन्यांपैकी एक बनली आहे.
नारायण यांच्या कार्यकाळात काही अडचणीही आल्या. डिझाईन टूल कंपनी फिग्मा खरेदी करण्यासाठी Adobe ने सुमारे 20 अब्ज डॉलरची बोली लावली होती. मात्र नियामकांच्या आक्षेपांमुळे हा करार रद्द करावा लागला आणि कंपनीला सुमारे 1 अब्ज डॉलर ब्रेकअप फी भरावी लागली. दरम्यान, जनरेटिव्ह एआयमुळे सॉफ्टवेअर उद्योगात होणाऱ्या मोठ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर 2026 मध्ये Adobe च्या शेअर्सवर दबावही दिसून आला आहे आणि वर्षाच्या सुरुवातीपासून सुमारे 23 टक्के घसरण झाली आहे.
नारायण यांनी आपल्या मेलमध्ये सांगितले की, एआयच्या युगात Adobe समोर मोठ्या संधी आहेत. सर्जनशीलतेचे पुढील युग एआयद्वारे आकार घेत असून कंपनी त्याचे नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Adobe चे सर्वोत्तम दिवस अजूनही पुढे आहेत, असेही त्यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटले.

























































