PCB ला झटका! PSL ला धुडकावत प्रसिद्ध क्रिकेटपटू IPL मध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 च्या रणसंग्रामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे. केकेआरने झिम्बाब्वेचा धडाकेबाज गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीला ताफ्यात सामील करून घेताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) जळफळाट झाला आहे. मुस्तफिजूर रहमानच्या जागी मुजरबानीची निवड करण्यात आली आहे. मात्र, यासाठी मुजरबानीने आयपीएलच्या करारासाठी पाकिस्तान सुपर लीगला (PSL) लाथ मारली आहे. झिम्बाब्वेच्या या पठ्ठ्याने थेट इस्लामाबाद युनायटेडचा करार धुडकावून लावल्याने पाकिस्तान आता चवताळला असून, मुजरबानीवर कायदेशीर कारवाईची धमकी देऊ लागला आहे.

मुजरबानीला पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेडने शमार जोसेफच्या जागी १.१ कोटी पाकिस्तानी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतले होते. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत लीग असलेल्या आयपीएलची साद पडताच मुजरबानीने पाकिस्तानचा रस्ता सोडला. २६ मार्चपासून पीएसएल सुरू होत असतानाच मुजरबानीने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. जिओ सुपरच्या वृत्तानुसार, वैफल्यग्रस्त झालेला पीसीबी आता कोर्टाची पायरी चढण्याच्या वल्गना करत आहे, पण आयपीएलच्या ग्लॅमरसमोर पाकिस्तानची ही ‘नौटंकी’ फार काळ टिकणारी नाही, हेच स्पष्ट दिसत असल्याचा चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.

हिंदुस्थानचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर फेकला गेल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे. अद्याप त्याच्या जागी कोणाची वर्णी लागेल हे स्पष्ट नसले तरी, मुजरबानीच्या रूपाने केकेआरला एक ‘मॅचविनर’ मिळाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेला सुपर-८ पर्यंत खेचून आणण्यात मुजरबानीचा मोलाचा वाटा होता. त्या स्पर्धेत १३ विकेट्स घेत त्याने आपली ताकद दाखवून दिली होती.