
उत्तराखंडमधील पवित्र बद्रीनाथ मंदिर आणि केदारनाथ मंदिर येथे 2026 च्या चारधाम यात्रेपूर्वी नवे कडक नियम (SOP) लागू करण्यात आले आहेत. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे यंदाची यात्रा अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. नव्या नियमांनुसार आता मंदिर परिसरात मोबाईल फोन वापरण्यावर बंदी असणार आहे. तसेच फोटो आणि व्हिडिओग्राफीला देखील पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
केवळ इतकेच नाही तर, गर्भगृहाजवळ कोणत्याही प्रकारचे रेकॉर्डिंग करण्यास परवानगी नाही. यामुळे आता दर्शनावेळी होणारी गर्दी तसेच त्यानिमित्ताने होणारा गोंधळ कमी होणार आहे. मंदिर समितीने स्पष्ट केले आहे की, सनातन धर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर धार्मिक परंपरा आणि मंदिराची पवित्रता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमांबद्दल बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. यापूर्वी, समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गैर-सनातनवाद्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नव्या नियमांतर्गत भाविकांची सुरक्षा अधिक वाढवणे. त्याचबरोबर गर्दीवर नियंत्रण मिळवणे आणि मंदिरात शांत आणि भक्तिमय वातावरण राखणे यावर भर देण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, मोबाईल आणि सेल्फी संस्कृतीमुळे दर्शन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे भाविकांना अधिक सुसंगत आणि आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.


























































