
IPL 2026 सुरू होण्यापूर्वी एका 21 वर्षांच्या खेळाडूने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आपआपसात एक सराव सामना खेळला. या सराव सामन्यात गोल्डन नाईट्स आणि पर्पल नाईट्स हे दोन संघ एकमेकांना भिडले. या सामन्यात 21 वर्षीय अंगक्रिश रघुवंशीने बिंदास्त फलंदाजी करत गोलंदाजांना चोपून काढत शतक ठोकलं आणि संघालाही विजय मिळवून दिला. रघुवंशीच्या तोडफोड फटकेबाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दरम्यान, या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गोल्डन नाईट्स संघाने 199 धावा केल्या होत्या. रिंकू सिंहने (40), टीम सीफर्ट (30) आणि सार्थक रंजन (37) यांनी ताबडतोब फटकेबाजी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे संघाने 200 धावांचे आव्हान पर्पल नाईट्स संघाला दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना संघाची सुरुवात थोडी खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतल्याने संघ थोडा अडचणीत सापडला होता.
संघाला अडचणीत सापडलेलं पाहून 21 वर्षीय अंगक्रिश रघुवंशी संघासाठी धावून आला. त्याने हळूहळू फलंदाजी करत स्वत:ला सेट करून घेतलं आणि त्यानंतर गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. त्याने 29 चेंडूंमध्येच अर्धशतक ठोकलं आणि 55 चेंडूंमध्ये शतक ठोकलं. त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे संघाचा विजय जवळपास निश्चित झाला. त्याने नाबाद फलंदाजी करताना 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 103 धावांची अविस्मरणीय फलंदाजी केली. त्यामुळे पर्पल नाईट्स संघ 6 धावांनी विजयी झाला.


























































