मुंबई-ठाण्यातील म्हाडाच्या पाच हजार घरांची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-ठाण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या तब्बल पाच हजार घरांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यात मुंबईतील तीन हजार आणि ठाण्यातील दोन हजार घरांचा समावेश असणार आहे.

स्वस्तात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहतात. म्हाडा मुंबईतील 2800 ते 3000 घरांच्या विक्रीसाठी मार्चच्या शेवटच्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मुंबई मंडळाकडून सध्या घरांची जमवाजमव आणि किमती निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. किमती निश्चित होताच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

लॉटरीमध्ये अॅडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम अंतर्गत निर्माणाधीन घरांसह पवई, घाटकोपर, प्रतीक्षा नगर येथील विखुरलेल्या 64 घरांचा तसेच मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून मिळालेल्या 143 घरांचाही समावेश आहे. ही घरे लोअर परळ, वडाळा, माझगाव अशा प्राईम लोकेशनवर आहेत.

ठाण्यातील घरांसाठी एप्रिलअखेर जाहिरात

मुंबईपाठोपाठ म्हाडाच्या कोकण मंडळानेदेखील घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. लॉटरीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून घरांची जमवाजमव आणि किमती निश्चित करण्यास सुरुवात होईल. एप्रिलअखेरपर्यंत सुमारे दोन हजार घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आमचे नियोजन आहे. यात चितळसर, मानपाडा, बाळकूम अशा विविध लोकेशनवरील घरांसह 20 टक्के योजनेतील घरांचा समावेश असेल, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सांगितले.

g म्हाडाच्या मुंबई मंडळाने याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये 2030 घरांसाठी शेवटची लॉटरी काढली होती. या लॉटरीसाठी तब्बल 1,13,811 जणांचे अर्ज प्राप्त झाले होते.

g 2025 मध्ये दिवाळीत मुंबईतील घरांसाठी लॉटरी येणार होती, परंतु काही कारणास्तव ही लॉटरी न आल्यामुळे अर्जदारांचा हिरमोड झाला होता. पुन्हा मुंबईतील घरांसाठी जाहिरात कधी प्रसिद्ध होणार याकडे अर्जदारांचे डोळे लागले होते. अखेर आता अर्जदारांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.