
बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबारप्रकरणी एकाला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा ऊर्फ गोलू पंडित असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून मोक्का न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पंडितच्या अटकेने अटक आरोपीची संख्या 14 झाली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे जुहू येथे घर आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार झाला होता. गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला.
पोलिसांनी तपास करून पुणे आणि मुंबई येथून 13 जणांना अटक केली होती. त्या सर्व आरोपींविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. आरोपीच्या चौकशीत गोलू पंडितचे नाव समोर आले. गोळीबारानंतर गोलू हा पळून गेला होता. तो उत्तर प्रदेशला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गोलू पंडितला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून आज पोलीस बंदोबस्तात मोक्का न्यायालयात हजर केले होते. त्याने यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना चिथावणी दिली होती. चिथावणी देऊन कटात समाविष्ट करून घेतले होते. तसेच त्याने आरोपींना आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत पुरवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये राजस्थान येथे गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुह्यात गोलूला अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला होता, तर रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबारासाठी एक महिन्याअगोदर प्लॅन करण्यात आला होता. गोळीबारासाठी शूटर नेमण्याची जबाबदारी गोलूवर होती अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.


























































