आर. एन. इलेक्ट्रिकल्सच्या गैरकारभाराची महावितरणकडून चौकशी होणार; उपकेंद्रांमध्ये निकृष्ट लाईट्स, पाइपचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणच्या बारामती, पुणे, नाशिक, कोल्हापूर परिमंडळांत आर. एन. इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदाराकडून बनावट बिलिंग, आर्थिक अपहार व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अपघात झाल्याचे ठोस पुरावेच शिवसेना आमदार महेश सावंत यांनी विधानसभेत मांडून कोटय़वधींचा भ्रष्टाचार उघड केला. त्यावर याप्रकरणी महावितरणच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

महेश सावंत यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. आर. एन. इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदाराकडून उपकेंद्रांमध्ये 2019 ते 2026 या कालावधीत केलेल्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले. त्याची अनेक बोगस बिले काढून सरकारचे कोटय़वधींचे नुकसान केले. या कंत्राटदाराने जी 630 स्ट्रीट लाईट्स लावल्या त्या 7245 रुपयांच्या लावण्याऐवजी कमी दर्जाच्या 950 रुपयांच्या लावल्या आणि बिले मात्र 7245 रुपये दराने दिली. ठिकठिकाणी कंत्राटदाराने जीआयऐवजी एमएसचे पाइप लावलेत. आार्ंथगसाठी सीआयऐवजी जीआयचे पाइप लावलेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन मृत्यू झाले आहेत. मंत्र्यांनी उत्तरामध्ये सांगितले की मृत्यूची कुठेही नोंद नाही, पण त्या घटनांसंदर्भात एफआयआरची संपूर्ण नोंद आलेली आहे, याकडे महेश सावंत यांनी लक्ष वेधले.

आर.एल. इलेक्ट्रिकल्सचा हा कोटय़वधींचा फक्त बारामतीचा अहवाल आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूरमध्येही भ्रष्टाचार झालेला आहे. जे या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेत त्याबाबत चौकशी झालेली नाही. हा भ्रष्टाचार करून या कंत्राटदाराने भूखंड, सोने, महागडय़ा गाडय़ा अशी कोटय़वधींची काळी माया जमा केली आहे. या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी महेश सावंत यांनी केली.

मंत्री मेघना साकोरे यांनी या लक्षवेधीला उत्तर देताना, आर.एन. इलेक्ट्रिकल्सला प्रत्येक जिह्यात निविदेप्रमाणे काम देण्यात आले आहे. दोन घटना जिथे घडल्या आहेत तिथे आर.एन. इलेक्ट्रिकल्सने काम केलेले नाही. या कंपनीबद्दल कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही असा दावा केला.