
प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना अजित दादा यांच्या पक्षाचा संपूर्णपणे ताबा घ्यायचा होता, असा आरोप करत रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. या आरोपांना सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. पक्षावर पकड कुणाची यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता अजित पवार गटाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. या पत्रामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षातील वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत आणि पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीबाबत माहिती दिली आहे. याच पत्रामध्ये त्यांनी असेही नमूद केले आहे की, 28 जानेवारी 2026 नंतर कोणत्याही व्यक्तीने पक्षाच्या वतीने केलेला पत्रव्यवहार वैध धरला जाऊ नये आणि अधिकृत कामासाठी त्याकडे दुर्लक्ष करण्यात यावे. तसेच इथून पुढे मी जो पत्रव्यवहार करेन तोच अधिकृत आणि ग्राह्य धरावा.
विशेष म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ या शासकीय बंगल्यावर मंगळवारी अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यानंतर हे पत्र समोर आल्याने अजित पवार गटामध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.
सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता, रोहित पवार यांचा मोठा आरोप
अजितदादांचा विमान अपघात
अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे अपघात झाला. मुंबईहून बारामतीकडे निघालेले चार्टर्ड विमान लँडिंग दरम्यान कोसळले आणि या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या अपघातावर संशयही व्यक्त केला जात असून राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार याबाबत सातत्याने पारदर्शक चौकशीची मागणीही करत आहेत. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. अशातच सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला 28 जानेवारीनंतरचा पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार वैध धरला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे अजित पवार गटामध्ये अंतर्गत संघर्षाची ठिणगी पेटल्याची चर्चा आहे.



























































