द कम्प्लिट मॅन… ‘रेमंड’चे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध ‘रेमंड’ समूहाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण विजयपत सिंघानिया यांचे आज मुंबईत निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘रेमंड’ला ‘द कम्प्लिट मॅन’ ही ओळख विजयपत सिंघानिया यांनीच दिली होती.

विजयपत सिंघानिया यांनी वर्ष 1980 मध्ये ‘रेमंड’चे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. बदलत्या काळानुसार ‘रेमंड’ला नवी दिशा देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. आईवडील, पत्नी आणि मुलांसह संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारा कुटुंबवत्सल अशी हिंदुस्थानी पुरुषांना खरी ओळख देणारी ‘द कम्प्लिट मॅन’ ही टॅगलाइन वापरून बनवलेल्या जाहिरातींची जगभरात चर्चा झाली. त्यामागील संकल्पना विजयपत सिंघानिया यांचीच होती. त्यानंतर रेमंडने विविध प्रकारच्या वस्त्र उत्पादनांची शृंखला सादर केली. याशिवाय पंपनीचा मोठय़ा प्रमाणात विस्तार केला.

मुंबईचे शेरिफ होते विजयपत सिंघानिया

विजयपत सिंघानिया यांना वर्ष 2006मध्ये ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरवण्यात आले होते. त्यांनी 2005मध्ये मुंबईचे शेरिफ पदही भूषविले होते. त्यांनी 2015मध्ये त्यांचे 37 टक्के समभाग मुलगा गौतम यांच्या नावे केले, मात्र त्यानंतर त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले होते. यावरून त्यांनी मुलासोबत कायदेशीर लढा दिला आणि तो जिंकलाही.

हॉट एअर बलूनचा विश्वविक्रम

विजयपत सिंघानिया यांना एव्हिएशनमध्ये प्रचंड रुची होती. 2005मध्ये वयाच्या 67व्या वर्षी हॉट एअर बलून 69,852 फूट या सर्वाधिक उंचीवर नेण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांनी 1988मध्ये लंडन ते अहमदाबादपर्यंत एक मायक्रोलाईट विमान एकटय़ानेच उडवीत आणले होते. हिंदुस्थानच्या हवाई दलाने त्यांना ‘मानद एअर कमोडोर’ ही उपाधी देऊन गौरव केला होता.