900 मते गेली कुठे? महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मतमोजणीचा गैरप्रकार परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप; निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात हायकोर्टात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai High court

 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप करत परिवर्तन उत्कर्ष आघाडीने मुंबई हायकोर्टात रिट अर्ज दाखल केला आहे. 900 मते गेली कुठे, असा सवाल करत निवडणूक प्रक्रिया, मतमोजणी आणि निकालाला रिट अर्जातून आव्हान देण्यात आले आहे.

मसापची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण अध्यक्षपदी निवडून आले. सोमण यांनी परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रा. मिलिंद जोशी यांचा पराभव केला. प्रा. मिलिंद जोशी आणि योगेश सोमण यांच्यात केवळ 45 मतांचे अंतर आहे. या प्रकरणी तत्काळ फेरमतमोजणीची लेखी मागणी परिवर्तन उत्कर्ष आघाडीने केली होती. ती निवडणूक अधिकाऱ्यांनी नाकारली होती.

निवडणुकीत मतमोजणी करताना अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप या पॅनेलने केला आहे. मतपेटी सील करताना झालेल्या एकूण मतदानाची आकडेवारी अथवा टक्केवारी दिलेली नाही. पत्रिका किती छापल्या, किती पाठवल्या, किती परत आल्या, मृत किती, दुबार किती याचा कसलाही हिशेब दिला गेला नाही. मतमोजणी करताना उमेदवारांनी आग्रह करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिका न दाखवता केवळ वाचून दाखवल्या, असे अनेक आरोप परिवर्तन  उत्कर्ष आघाडीने केलेले आहेत. मतमोजणीसाठी आलेली माणसे आणि निवडणूक अधिकाऱयांचे वर्तन संशयास्पद होते, अशी टीका परिवर्तन उत्कर्ष आघाडीने आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

…तोपर्यंत कामकाजास स्थगिती द्यावी

परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या सुनीताराजे पवार म्हणाल्या, मतदारांनी भरभरून मते दिली. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी पराभव केला. परिवर्तन उत्कर्ष आघाडीला पाठिंबा देणाऱ्या शाखांच्या प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे 6200 मतपत्रिका जमा केल्या होत्या याची नोंद आमच्याकडे आहे. प्रत्यक्षात 5300 मते मिळाली. ही 900 मते कुठे गेली? आम्ही न्यायालयात रिट अर्ज दाखल केला आहे. यावर सुनावणी होईपर्यंत निवडून आलेल्या कार्यकारणीस कार्यालयीन कारभार हस्तांतरित करण्यास स्थगिती मिळावी, अशी मागणी केलेली आहे.