
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षनेतृत्वावरून राष्ट्रवादीत धुसफुस सुरू असल्याचे दिसून येत आहे. गोंदिया जिह्यातील तिरोडा येथे झालेल्या कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या सभेत बॅनरवरून अजितदादांचा फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधान आले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पाठ फिरवली होती. सुनील तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या रायगडमध्ये अजितदादांचा फोटो बॅनरवरून हटविण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांचा फोटो गायब झाल्याने पक्षनेतृत्वावरून कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
मौन बाळगल्याने शंका वाढल्या
या प्रकरणावर पत्रकारांनी विचारणा केली असता, प्रफुल्ल पटेल यांनी सविस्तर उत्तर देण्याचे टाळले. आता राहू द्या सगळं हे…, असे उत्तर देत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. बॅनरवरून अजितदादांना बाजूला करण्याच्या कृतीमुळे पक्षात नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू आहेत की नेत्यांमधील समीकरणे बदलली आहेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.




























































