
लेबनानची राजधानी बेरूतमध्ये इस्त्रायली सैन्याने बुधवारी रात्री केलेल्या भीषण हल्ल्यात हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नईम कासिम याला मोठा धक्का बसला आहे. या हल्ल्यात कासिमचा सख्खा पुतण्या आणि खासगी सचिव अली युसूफ हर्शी मारला गेल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. इस्त्रायली सैन्याने अधिकृत निवेदन जारी करून या कारवाईची पुष्टी केली आहे.
युसूफ हर्शी हा केवळ नईम कासिमचा नातेवाईकच नव्हता, तर तो त्याचा अत्यंत विश्वासू सल्लागार आणि खासगी सचिव म्हणून कार्यरत होता. हिजबुल्लाह प्रमुखाचे कार्यालय सांभाळणे आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत हर्शीची भूमिका महत्त्वाची होती. हर्शीचा खात्मा हा हिजबुल्लाह अंतर्गत कार्यप्रणालीवर झालेला मोठा प्रहार आहे, असे इस्रायलचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष आणखी पेटणार आहे.
बुधवारी रात्री अमेरिका आणि इराणमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. या करारानंतरही लेबनानवरील हल्ले थांबले नाहीत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये 254 जणांचा मृत्यू झाला. युद्धविरामाचा अर्थ लेबनानमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवरील हल्ले थांबवणे असे होत नाही, अशी कठोर भूमिका अमेरिका आणि इस्रायलने घेतली आहे. यावर इराणने स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली.
दुसरीकडे इस्त्रायलच्या या कारवाईनंतर हिजबुल्लाहनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्त्रायलने युद्धविरामाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत हिजबुल्लाहने गुरुवारी पहाटे उत्तर इस्त्रायलमधील मनारा भागावर रॉकेटचा वर्षाव केला. लेबनानवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे हिजबुल्लाहने आपल्या निवेदनात म्हटले आहे.





























































