तू काळा आहेस मला शोभत नाहीस, पत्नीने सुपारी देऊन केला पतीचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरुवातीला साधा दरोडा आणि हत्या असा भासणारा प्रकार अखेर थरारक कटकारस्थान ठरला आहे. मसाल्याच्या व्यापाऱ्याच्या हत्येमागे त्याच्याच पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचलेला खूनाचा कट उघडकीस आला असून, विश्वासघात, अपमान आणि सूड यांची धक्कादायक कहाणी तपासातून समोर आली आहे.

मध्य प्रदेशमध्ये 7 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. 28 वर्षीय देवकृष्ण पुरोहित यांचा त्यांच्या घरात मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे स्पष्ट चिन्ह होते. सुरुवातीला पत्नी प्रियंका पुरोहित (25) हिने पोलिसांना सांगितले की, अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुमारे 3.5 लाखांचा ऐवज लुटला आणि प्रतिकार केल्यामुळे पतीची हत्या केली.
पण जसजसा पोलीस तपास पुढे सरकू लागला तसतसा यातले धक्कादायक खरे कारण समोर आले.

मृत देवकृष्ण यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात बराच काळ तणाव होता. त्यांची बहिणी ज्योती यांनी आरोप केला की प्रियंका वारंवार देवकृष्ण यांचा अपमान करत असे. “तू काळा आहेस, तु माला शोभत नाहीस, मला याहून चांगला जोडीदार हवा,” असे ती म्हणत असे.

तपासात पुढे उघड झाले की प्रियंका हिचे राजगड येथील 32 वर्षीय कमलेश पुरोहित याच्यासोबत प्रेमसंबंधात होते. देवकृष्ण हे त्यांच्या नात्यासाठी अडथळा असल्याने त्यांना हटवण्याचा निर्णय दोघांनी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. या कटासाठी कमलेशने त्याचा साथीदार सुरेंद्र भाटी याला तयार केले. देवकृष्ण यांची हत्या करण्यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती त्यापैकी 50 हजार आगाऊ देण्यात आले होते.

खुनाच्या रात्री घराचे दार मुद्दाम उघडे ठेवण्यात आले होते. सुरेंद्र भाटी घरात शिरला आणि झोपेत असलेल्या देवकृष्ण यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर हा प्रकार दरोड्यासारखा भासावा म्हणून घरातील वस्तू अस्ताव्यस्त करण्यात आल्या आणि काही दागिने चोरीला गेल्याचे दाखवण्यात आले. प्रियंकाने स्वतःलाही पीडित असल्याचा आव आणत आरोपींनी तिला बांधून ठेवले आणि ओलीस धरले, असा बनाव केला.

मात्र तपासात हा बनाव हळूहळू उघड झाला. प्रियंकाचे जबाब वारंवार बदलत असल्याने पोलिसांना संशय आला. घराची झडती घेतली असता तिने चोरीला गेल्याचा दावा केलेले दागिने घरातच सापडले. मोबाईल कॉल डेटा आणि इतर तांत्रिक पुराव्यांमधून तिचे कमलेशशी असलेले संबंध आणि खुनाच्या वेळी झालेल्या संवादाचे तपशील स्पष्ट झाले.

सततच्या चौकशीनंतर प्रियंका कोसळली आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रियंका आणि कमलेश पुरोहित यांना अटक केली आहे. भाडोत्री मारेकरी सुरेंद्र भाटी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. खुनापूर्वी काही नशा किंवा औषध देण्यात आले होते का, याचा तपास फॉरेन्सिक अहवालातून केला जात आहे. या घटनेमुळे देवकृष्ण यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या आई खेन्ची बाई यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “मला फक्त न्याय हवा आहे,” असे त्यांनी सांगितले.

बहिण ज्योती यांनी प्रियंकाच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप करत सांगितले की, ती सतत मोबाईलमध्ये व्यस्त असे, घरातील जबाबदाऱ्या टाळत असे आणि देवकृष्ण व त्यांच्या आईमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असे. 2020 पासूनच तिच्या वर्तनावर संशय असल्याचे त्यांनी नमूद केले.