
मुंबई आणि उपनगरांमध्ये सातत्याने वाढणाऱ्या तापमानावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली आहे. वाढत्या उष्णतेच्या समस्येवर सरकारने शोधलेला उपाय म्हणजे झाडे तोडून तिथे काँक्रीट ओतण्याचा असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा उष्णतेच्या झळा सुरू आहेत. मागील काही दिवस सरासरीच्या पातळीवर राहिलेल्या कमाल तापमानात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली. याच वेळी हवेची गुणवत्ताही घसरून प्रदूषणात वाढ झाली. येत्या दिवसांत उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मार्चमध्ये कहर केलेल्या उष्णतेची तीव्रता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी झाली होती. मात्र दुसऱ्या आठवड्यात तापमानात वाढ झाली.
सोमवारी बोरिवलीमध्ये 39.3 अंश, सांताक्रूझमध्ये 40 अंश, चेंबूरमध्ये 42.4 अंश, नवी मुंबईमध्ये 44.1 अंश आणि ठाण्यामध्ये 48.6 अंश तापमानाची नोंद झाली. ‘मुंबई रेन्स’ या एक्स अकाउंटवरून ही आकडेवारी शेअर करण्यात आली आहे. हे ट्विट रिट्विट करत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला.
मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा; हवेची गुणवत्ता घसरणीला, प्रदूषणात वाढ
मुंबईतील तापमानाचा पारा चढत असतानाच पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. तापमान वाढीवर सरकारकडे एकच उपाय आहे, आणखी झाडे तोडणे आणि बिल्डरांना अधिक काँक्रीट ओतण्याची परवानगी देणे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
Oh the Government has a solution for this-
Cut more trees and let builders pour more concrete. https://t.co/Z5YviBn3JO— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 13, 2026





























































