खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात जावे असे का वाटले नाही? – सुप्रिया सुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात किंवा लोकप्रतिनिधीकडे जावेसे का वाटले नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरलो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्या सोमवारी माध्यमांशी बोलत होत्या.

भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये गलिच्छ गोष्टी होत होत्या. आता यात हवाल्याचाही अँगल आला आहे. एक भोंदूबाब काय-काय उद्योग करत होता देवालाच ठाऊक. सत्तेतल्या अनेक लोकांचे यात नाव आलेले आहे. त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि राजकारण न आणता महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि पारदर्शक चौकशी सुरू राहिली पाहिजे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला असे का वाटते नाही की आपण कुठल्यातहरी व्यक्तीकडे जावे आणि न्याय मागावा. म्हणजे आपण व्यवस्था म्हणून किंवा व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून अयशस्वी ठरलो आहोत का? कुणीतरी म्हटले की खरातकडे इतके राजकीय नेते जात होते त्यामुळे आपल्याला न्याय मिळेल की नाही असे पीडितांना वाटत असेल. हे खूप घातक आहे. एवढे कायदे आपण करतो, त्याचा उपयोग काय? कायद्यांची अंमलबजावणी होणार नसेल तर हे चिंताजनक आहे. सत्तेतल्या आणि विरोधी दोन्ही लोकांनी याचे आत्मचिंतन केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीला पत्र पाठवून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचा इशारा दिला आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीला पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडूनच सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या की, यात किती तथ्य आहे माहिती नाही. मुख्यमंत्री याचे उत्तर देऊ शकतात. पण अशा गोष्टी असतील तर सुनेत्रा पवार यांची सुरक्षा वाढवली पाहिजे.

अजित पवारांचा विमानाचा अपघात कसा झाला, काय झाला… एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघात होतो आणि त्याचा एफआयआर दाखल होत नाही. रोहित पवार यांना अनेक राज्यात जावे लागले, तेव्हा कर्नाटकात जाऊन न्याय मिळाला. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना एफआयआर दाखल करायला त्रास झाला तर सर्वसामान्य लोकांचे काय? अशी भीती लोकांना वाटत असेल, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका? एटीएसला बीडमधून पत्र