मंत्रालयाला एलिट गार्डचे संरक्षक कवच, मुख्य प्रवेशद्वारावर घातक शस्त्रांसह कमांडो तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण राज्याचा राज्यकारभार चालणाऱ्या मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्यामुळे आता मंत्रालयाला पोलिसांच्या ‘एलिट गार्ड’ या अत्यंत घातक कमांडोचे संरक्षक कवच देण्यात आले आहे. डोळय़ाला काळा गॉगल, हातामध्ये एके-47 आणि उजव्या हाताचे एक बोट बंदुकीच्या ‘ट्रिगर’वर अशा सदैव सज्जतेमध्ये हे कमांडो सध्या मंत्रालयातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

मुंबईसह महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणांना सध्या मोठा धोका आहे. मंत्रालयाला तर सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आता तर मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गार्डन गेटवर प्रत्येकी एक-एक एलिट गार्डमधील प्रशिक्षित कमांडो तैनात केला आहे. त्याच्या हातात एके-47 सारखे अत्याधुनिक शस्त्र दिलेले आहे. यांची नजर फक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या हालचालींवर असते.

तिहेरी सुरक्षा कवच

मंत्रालयाला तिहेरी सुरक्षा कवच आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या बाहेर पोलिसांची चौकी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि इमारतीमध्ये पोलीस तैनात आहेत. त्याशिवाय साध्या वेषातील पोलिसांची सतत गस्त असते. त्यात आता एलिट गार्डची भर पडली आहे.

‘एलिट गार्ड’ म्हणजे कोण

एलिट गार्ड किंवा एलिट पोलीस फोर्स ही पोलीस दलातील विशेष पोलिसांची प्रशिक्षित तुकडी असते. या तुकडीतील कमांडोंचा वापर दहशतवादी कारवायांच्या विरोधात आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि अत्यंत गोपनीय आणि उच्च दर्जाच्या मोहिमांमध्ये वापर केला जातो. दहशतवादी हल्ले परतवून लावण्याचे विशेष प्रशिक्षण या तुकडीला दिले गेलेले असते.

अधिवेशनाच्या काळात विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीमचे कमांडो तैनात केले जातात. एका लोखंडी टॉवरवर क्वीक रिस्पॉन्स टीमचे कमांडो हे डोळय़ावर काळा गॉगल आणि हातात एके-47 घेऊन तैनात केले जातात; पण मंत्रालयात एलिट पोलीस पर्ह्स हे आता कायमस्वरूपी तैनात करण्यात येतील.