पुरातत्व डायरी- मगधचे विस्मृतीत गेलेले रत्न विक्रमशिला विद्यापीठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. आशुतोष पाटील
[email protected]

नालंदाप्रमाणेच विक्रमशिला विद्यापीठानेही जगाला ज्ञान दिले, संस्कृतीचे संवर्धन केले. इथल्या विखुरलेल्या विटा आणि भग्न मूर्ती म्हणजे केवळ दगडमाती नसून ते समृद्ध इतिहासाची पुनर्रचना करण्याची प्रेरणा देत आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचा आणि ध्येयवादाचा जिवंत वारसा अधोरेखीत करतात.

प्राचीन मगध म्हणजे आताच्या बिहार प्रांतात स्थित होते एक प्राचीन विद्यापीठ – विक्रमशिला विद्यापीठ. नालंदाच्या समकालीन असलेले हे विद्यापीठ नालंदापासून केवळ 15-20 मैलांच्या अंतरावर असले तरी कधी प्रतिस्पर्धी म्हणून त्यांचे कार्य राहिले नाही. नालंदा विद्यापीठाच्या तुलनेत विक्रमशिला विद्यापीठाचे उल्लेख ग्रंथांमधे तुरळक येतात. त्यामुळे हे विद्यापीठ नेमके कुठे होते हे शोधण्याचेही मोठे आव्हानच अभ्यासकांसमोर होते. लामा तारानाथ (इ.स. 1575-1634) तिबेटीयन तंग्युरच्या लिखाणासह तिबेटी स्रोतांकडून ‘गुरुगुण धर्माकर’ नावाचा मजकूर तसेच तिबेटी भिक्षू नाग-टछो आणि धर्मस्वामी आणि इतर लोकांच्या प्रवासाच्या वृत्तांत श्री. फ्रांके यांनी स्मृती येथील तळघरातून शोधलेले दोन ताम्रपट आणि सारंगधर सहस्रटीका आणि ‘वृत्त स्वयंभू पुराण’सारख्या काही संस्कृत ग्रंथांचा समावेश होता. या सर्व नोंदींमध्ये असे नमूद केले आहे की, ‘मगधाच्या उत्तरेस, गंगेच्या दक्षिणेकडील टेकडीवर राजा धर्मपाल (इ.स. 783-820) यांनी विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केली होती.’

बिहार राज्यातील भागलपूरमधील अंटीक गावातील उत्खननात ऐतिहासिक अवशेष मिळाले हे विक्रमशिला विद्यापीठाचे अवशेष होते. या जागेचा विस्तार सुमारे 50 कि.मी. आहे. भागलपूरपासून पूर्वेस सुमारे 15 कि.मी. अंतरावर लामातारणाथ यांनी वर्णन केलेल्या या विद्यापीठाचे अवशेष आहेत. विक्रमशिला विद्यापीठाचा शोध घेणे अत्यंत कठीण ठरले. जवळपास इ.स. 1960 पर्यंत या विद्यापीठाचे अचूक स्थान निश्चित झाले नव्हते आणि तेथे कोणतेही महत्त्वपूर्ण उत्खननही झाले नव्हते. अनेक शतकांनंतर धर्मस्वामी यांच्या नोंदीनंतर 16 जानेवारी 1811 रोजी प्रवासी बुचनन यांनी प्रथमच विक्रमशिलेच्या अवशेषांची नोंद केली.

बुचनन यांनी या अवशेषांचा अभ्यास करून असा अंदाज व्यक्त केला की, येथे एखादा राजवाडा किंवा गोलाकार टेकडी असावी. ती उंचवटय़ासारखी दिसत असली तरी पुरातत्त्वीय उत्खननाशिवाय ती इमारत आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येणार नाही असे त्यांनी नमूद केले. त्यांनी असेही लिहिले आहे की, जर ती वास्तू असेल तर ती एखादे जाळून टाकलेले भव्य मंदिर असावे, अन्यथा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर विध्वंस होणे शक्य नाही. त्या परिसराभोवती चौकोनी तटबंदीचे अवशेष दिसून येत होते आणि जमिनीवर जळलेल्या विटांचा थर पसरलेला होता. तसेच अनेक चौकोनी दगड आसपासच्या भागात विखुरलेले असल्याची नोंद त्यांनी केली. इ.स. 1929 मध्ये ओल्डहॅम यांनी बुचनन यांच्या 1811 मधील नोंदींच्या आधारे विक्रमशिला विद्यापीठ त्या परिसरात असण्याची शक्यता व्यक्त केली. अखेर अंटीक येथे प्रा. बी. पी. सिन्हा यांनी इ.स. 1960 ते 1969 दरम्यान उत्खनन सुरू केले. हे उत्खनन तुलनेने मर्यादित स्वरूपाचे असले तरी त्यातून विटांनी बांधलेला एक मोठा स्तूप समोर आला. या स्तूपाभोवती दोन मीटर उंचीवर प्रदक्षिणा मार्ग होते आणि चारही दिशांना सभागृहे व लहान खोल्या सापडल्या.

त्यानंतर इ.स. 1972 ते 1981 दरम्यान भारतीय पुरातत्त्व विभागाने मोठय़ा प्रमाणावर उत्खनन केले. त्यामध्ये 330×330 चौ. मीटर क्षेत्रफळाचा विशाल विहार उघडकीस आला. उत्खननादरम्यान टेराकोटा, दगड, लोखंड, तांबे, सोने, चांदी, कांस्य, हस्तिदंत, हाडे आणि कवच यांसारख्या विविध वस्तू मोठय़ा प्रमाणात सापडल्या. तसेच भगवान बुद्ध, बोधिसत्त्व, मैत्रेय, मंजुश्री, मारिची, महाकाल, तारा, अपराजिता, सदाक्षरी अवलोकितेश्वर, नवग्रह, विष्णू, शिव, उमा-महेश्वर, सूर्य, महिषासुरमर्दिनी आणि कौमारी यांसारख्या अनेक देवतांची शिल्पेही मिळाली. त्यापैकी बुद्ध, मैत्रेय, वज्रपाणी, अवलोकितेश्वर आणि लोकेश्वर यांच्या प्रतिमा विशेष उल्लेखनीय आहेत.

विक्रमशिलाच्या उत्खनन अहवालात इ.स. 1973-74 मध्ये सापडलेल्या टेराकोटा शिक्क्यांचा उल्लेख आहे. या शिक्क्यांवर दहाव्या शतकातील नागरी लिपीत संस्कृतमधील मजकूर कोरलेला होता. त्यापैकी एका शिक्क्यावर ‘श्री पुरुषोत्तमपाल’ असे लिहिलेले होते. दुसरा शिलालेख इ.स. 1975-76 मध्ये तारा प्रतिमेच्या शिखरावर सापडला. अकराव्या शतकातील पूर्व बंगाली लिपीत भ्रष्ट संस्कृतमध्ये ‘प्रतिहार उदयवराची भेट’ असा मजकूर त्यावर कोरलेला होता. या शिलालेखांच्या अभ्यासातून असे दिसते की, पाल राजांनी येथे वास्तू बांधल्याचे थेट लेखी पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. तसेच विहारामध्ये शिलालेखांची संख्या अत्यंत कमी असल्याचेही दिसते. उत्खननात केवळ दहा नाणी, सहा तांब्याच्या आणि चार चांदीच्या वस्तू सापडल्या. तांब्याच्या वस्तू गंजलेल्या अवस्थेत होत्या, तर चांदीची काही नाणी चांगल्या स्थितीत होती. त्यावर अग्निवेदीची छाप होती. ही नाणी दहाव्या शतकाच्या उत्तरार्धातील असून त्यावर ‘श्री विग्रह’ असे लिहिलेले होते.

तिबेटी संदर्भांनुसार, इ.स. 1234 मध्ये येथे आलेल्या तिबेटी बौद्ध भिक्षू धर्मस्वामी यांनी विक्रमशिलेविषयी नोंदी केल्या आहेत. त्यांच्या नोंदींवरून विक्रमशिला विद्यापीठ धर्मस्वामी यांचे थोरले बंधू चाग डीग आणि कश्मिरी पंडित शाक्य श्री भद्र यांच्या काळात अस्तित्वात होते, परंतु बाराव्या शतकाच्या अखेरीस ते नष्ट झाले.

चार शतकांहून अधिक काळ या विद्यापीठाने तग धरून आपले अस्तित्व कायम ठेवले होते. धर्मपालाने इथे मंदिरे, विहार बांधले. या विद्यापीठाला राजाश्रय दिला. विक्रमशिलातील वसतिगृहे व इतर इमारती अत्यंत सुबक आणि नियोजनबद्ध पद्धतीने बांधलेल्या होत्या. येथे 108 मंदिरे तसेच सहा महाविद्यालये अस्तित्वात होती. मध्यभागी एक आकर्षक महाबोधी मंदिर असून त्याची सहा प्रवेशद्वारे या सहा महाविद्यालयांकडे उघडत असत. संपूर्ण रचना कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे भासत होती. प्रत्येक महाविद्यालयात व्याख्यानांसाठी प्रशस्त सभागृहे होती आणि त्यांच्या भोवती मजबूत संरक्षणात्मक भिंत उभारलेली होती. बाराव्या शतकात या विद्यापीठात सुमारे 2000 भिक्षू-विद्वान वास्तव्यास होते. तसेच विद्यापीठाकडे अत्यंत समृद्ध व विशाल ग्रंथसंपदा असलेले ग्रंथालय होते, ज्याचा उल्लेख ‘तबकात-ए-नासरी’ या ग्रंथात केलेला आहे.

अशा प्रकारे विक्रमशिला विद्यापीठ हे केवळ एक शिक्षण केंद्र नसून प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे आणि स्थापत्यशास्त्राचे अजोड उदाहरण होते. जरी परकीय आक्रमणांनी या वास्तूचा भौतिक नाश केला असला तरी उत्खननातून मिळालेले अवशेष आजही त्या काळातील महानता सांगतात..
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)