बीड भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी पाठक यांना अटक, स्वच्छ कारभाराच्या दाव्याचे धिंडवडे निघाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात पोलिसांनी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक केली आहे. पाठक यांच्या अटकेने मोठी खळबळ उडाली आहे. पाठक यांना आता बीडच्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि भूसंपादन प्रकरणात चुकीची कामे करून तब्बल 73 कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याचे मास्टरमाईंड दस्तुरखुद्द तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक हेच होते. दिवसभर चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करणाऱया उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार सध्या रजेवर असल्याने एम. व्यंकटराम यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

जिह्यातून जाणाऱया महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. वाढीव मावेजा मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या नावे बनावट आदेश तयार करण्यात आल्याचेही समोर आले. या प्रकरणात शासनाची तब्बल 73 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली झाल्यानंतरही मागच्या तारखा टाकून बनावट आदेश काढण्यात आले. 154 प्रकरणांमध्ये वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला. या बनावट आदेशात 241 कोटी रुपयांचा वाढीव मावेजा मंजूर करण्यात आला. त्यापैकी 73 कोटी रक्कम खातेदारांना वितरितही करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेची भूसंपादन कार्यालयात अधिकृत नोंद नाही, दस्तऐवज नाही म्हणूनच संगनमताचा संशय बळावला. केवळ तत्कालीन जिल्हाधिकारीच नाही तर अजून अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे. घोटाळा आणि गैरकारभाराची एक साखळीच तयार झाली होती. सगळ्या गैरव्यवहाराचा आता पर्दाफाश होणार आहे.

मलिद्यासाठीच पदाला चिटकून होते

अविनाश पाठक पंधरा वर्षांपासून बीड जिह्यात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते. निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा बँकेचे प्रशासक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी अशी अनेक पदे त्यांनी बीडमध्येच भोगली. लोकप्रतिनिधींशी समन्वय राखून आपण किती विश्वासातील आहोत हे दाखूवन देत पाठक यांनी मोठे कारनामे केले आहेत. त्यांची बीड जिह्यातील कारकीर्द जेमतेमच होती. कोणतेच धाडसी निर्णय त्यांनी घेतले नाहीत. केवळ मलिदा लाटण्यासाठीच ते त्या त्या पदाला चिटकून होते या चर्चेला उधाण आले आहे.