
कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडमधून येणाऱ्या दुर्गंधी व प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील आदेशानंतर काही दिवस परिस्थिती ठीक असताना अचानक पुन्हा दुर्गंधी सुरू झाल्याने हायकोर्टाने आज त्याबाबत चिंता व्यक्त केली. रात्रीच्या वेळी किंवा पहाटे नेमके काय घडते? तेथे कत्तलखान्यातील कचरा किंवा इतर ठिकाणचा अतिरिक्त कचरा रात्री टाकला जातो का, असा सवाल करत या डम्पिंग ग्राऊंडवर लक्ष ठेवण्यासाठी एका स्वतंत्र निरीक्षकाची किंवा समितीची नियुक्ती करणार असल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
‘कन्नमवार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ आणि ‘वनशक्ती’ या स्वयंसेवी संस्थेने कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडच्या चुकीच्या कचरा व्यवस्थापनामुळे होणाऱया त्रासाबाबत न्यायालयात अॅड. अभिजित राणे व वनशक्तीच्या वतीने अॅड. झमान अली यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. 25 एप्रिल रोजी न्यायमूर्तींनी स्वतः या ठिकाणाची पाहणी केली होती.
खंडपीठाने सांगितले की, रात्रीच्या दुर्गंधीचे नेमके कारण आणि उगमस्थान काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. कारण आम्ही आमच्या सूत्रांमार्फत लक्ष ठेवून आहोत आणि त्यांच्याकडे चौकशी करत आहोत. आम्ही आदेश दिल्यानंतर 3-4 दिवस कोणतीही दुर्गंधी नव्हती आणि सर्व काही अगदी ठीक होते, पण आज हे असे का बदलले आहे आणि अचानक काय चुकले आहे? याबाबत खंडपीठाने पालिका तसेच कंत्राटदाराला विचारणा केली.
न्यायालय काय म्हणाले?
पालिकेला या ठिकाणी पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतील आणि कचरा टाकण्याच्या हालचालींवर संपूर्ण देखरेख ठेवावी लागेल. एका दिवसात कचऱयाच्या वजनात वाढ होत आहे. पहाटेच्या वेळी काहीतरी घडत असते. त्यामुळे प्रशासनाला येथील हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल. त्यासाठी महापालिकेच्या वेबसाइटशी थेट प्रक्षेपण जोडावे लागेल.


























































