
महाराष्ट्रात यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, 1 मार्च ते 9 मेदरम्यान राज्यभरात उष्माघाताची 236 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तसेच संशयित उष्माघातामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 86 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) नागरिकांमध्येही तीव्र उष्णतेशी संबंधित लक्षणे आढळून आली आहेत. डिहाड्रेशन, उष्णतेमुळे थकवा, उलट्या आणि डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमांतर्गत (NPCCHH) राज्य शासन 2019 पासून उष्माघात आणि उष्णतेशी संबंधित आजारांची जिल्हानिहाय माहिती संकलित करत आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिलपासून राज्यात दीर्घकाळ उष्णतेची लाट कायम असल्याने उष्णतेशी संबंधित आजारांच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवण्यात आले.
9 मेपर्यंत नोंदवण्यात आलेल्या संशयित उष्माघातामुळे झालेल्या 6 मृत्यूंपैकी लातूरमधील एका मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली आहे. उर्वरित 5 मृत्यूंची वैद्यकीय पडताळणी सुरू असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
नियमांनुसार, जिल्हास्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती मृत व्यक्तींच्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून मृत्यूचे कारण उष्माघात होते की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेते. पडताळणी सुरू असलेल्या मृत्यूंपैकी 2 प्रकरणे अहिल्यानगरमधील असून, उर्वरित प्रकरणे अकोला, लातूर आणि सोलापूर येथील आहेत.
दरम्यान, नागरिकांनी दुपारच्या कडाक्याच्या उन्हात शक्यतो बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

























































